देहूशी नाळ...! साकारले तुकोबांच्या रुपातील गणपती बाप्पा, सोनाली कुलकर्णींच्या घरचा गणेशोत्सव
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: September 20, 2023 04:06 PM2023-09-20T16:06:41+5:302023-09-20T16:07:23+5:30
आमचे आजी-आजोबा देहूगावला राहायचे, त्यामुळे देहूगावचे आमच्यावर अनेक संस्कार
पिंपरी : “आमचे आजी-आजोबा देहूगावला राहायचे, त्यामुळे देहूगावचे आमच्यावर अनेक संस्कार आहेत. त्यामुळे यंदा आम्ही देहूगाव आणि आजी-आजोबा यांच्याशी जवळचे नाते असलेली मूर्ती साकारली. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या रुपात आम्ही बाप्पा साकारण्याचा प्रयत्न केला असल्याचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सांगितले.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेली अनेक वर्ष आपल्या भावासह बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती घडवते. यंदाही तिने बाप्पाचे खास रुप साकारण्याचा प्रयत्न केला आहे. सोनालीने मूर्ती घडवण्यासाठी देहूगावची माती आणि घरातील तुळस याचा वापर केला आहे.
यंदाचा गणेशोत्सव भावनिक....
गेल्या पाच वर्षांपासून मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे मिळून आमचा बाप्पा बनवतो. यंदाचा गणेशोत्सव आमच्यासाठी खूप भावनिक आहे कारण, माझी आजी यंदा माझ्याबरोबर नाही. गेल्यावर्षी आजी आम्हाला सोडून गेल्यामुळे आम्ही गणेशोत्सव साजरा करू शकलो नव्हतो. एवढी वर्ष मी आणि माझा भाऊ मूर्ती बनवत असताना आजी दारावर उभी राहून आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायची. हा गणेशोत्सव आम्ही पहिल्यांदाच तिच्याशिवाय साजरा करत आहोत. परंतु, तिची आठवण कायम आमच्याबरोबर असेल, असंही तिने सांगितले.
बळीराजा सुखी व्हावा...
गणपती बाप्पाच्या माध्यमातून तिने तुकोबांचे रूप साकारले आहे. यावर्षी महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये वरून राजाने कृपादृष्टी दाखवली नाही. अनेक भागात दुष्काळाचे सावट आहे. महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडावा आणि बळीराजा सुखी व्हावा असे साकडे सोनालीने गणपती बाप्पा चरणी घातले आहे.