पोलीस दलातील सेवेचे सार्थक झाले : राष्ट्रपतीपदक जाहीर झालेल्या गणपतराव माडगूळकरांची भावना 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 07:06 PM2019-01-25T19:06:59+5:302019-01-25T19:08:14+5:30

पुरस्काराने मी समाधानी आहे. या पुढील काळातही चांगले काम करीत राहीन, अशी भावना पोलीस दलातील सेवेबद्दल राष्ट्रपतीपदक जाहीर झालेले देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गणपतराव सदाशिव माडगूळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

Ganpatrao Madgulkar's special interview | पोलीस दलातील सेवेचे सार्थक झाले : राष्ट्रपतीपदक जाहीर झालेल्या गणपतराव माडगूळकरांची भावना 

पोलीस दलातील सेवेचे सार्थक झाले : राष्ट्रपतीपदक जाहीर झालेल्या गणपतराव माडगूळकरांची भावना 

Next

योगेश्वर माडगूळकर 

पिंपरी : वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि जनतेशी थेट संबंध, तसेच आई-वडिलांच्या आशीर्वादानेच मला हा राष्ट्रपती सन्मान मिळाला. पुरस्कारामुळे पोलीस दलातील सेवेचे सार्थक झाले. पुरस्काराने मी समाधानी आहे. या पुढील काळातही चांगले काम करीत राहीन, अशी भावना पोलीस दलातील सेवेबद्दल राष्ट्रपतीपदक जाहीर झालेले देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गणपतराव सदाशिव माडगूळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 
                राष्ट्रपतिपदक शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यात त्यांनी पोलीस सेवेतील आपला प्रवास उलगडला. माडगूळकर १९८५ मध्ये पोलीस दलात दाखल झाले. ते गेले ३३ वर्षे पोलीस दलात कार्यरत असून, त्यांनी मुंबईमधील विविध पोलीस ठाण्यांत १६ वर्षे सेवा केली. त्यांनी वसई, ठाणे, नालासोपारा परिसरामध्ये काम केले. ते २००९ मध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर रुजू झाले. त्यांनी तिथे साडेतीन वर्षे काम पाहिले. त्यांनी डांगे चौकामध्ये झालेल्या तिहेरी खून खटल्याचा तपास तातडीने केला होता. 
हिंजवडी परिसरातील गुन्हेगारीला सक्षमपणे लगाम लावला होता. त्यासाठी त्यांना अनेक रोषांना सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी कुठल्याही दबाबाला न जुमानता सक्षमपणे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणातील बोकळलेली गुन्हेगारी मोडून काढली. यानंतर त्यांनी गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे शहर गुंडा स्काँडमध्येही काम केले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात काम केले आहे. 
               १९८८ मध्ये मुंबई विमानतळावर सेवेत असताना त्यांनी कस्टमच्या नजरेतून सुटलेले कोट्यवधींचे ‘ मॅनड्रक्स’ हे ड्रग्स पकडून संबधितावर कारवाई केली होती. त्या वेळी पोलीस महासंचालकांनी त्यांचे अभिनंदन करून सन्मान केला होता. २०१५ मध्ये चांगल्या सेवेबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदकाने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आत्तापर्यंतच्या सेवेमध्ये त्यांना एकूण सुमारे २३५ बक्षिसे मिळाली आहेत. अनेक गुन्ह्यांचा त्यांनी छडा लावला आहे.
               सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त म्हणून माडगूळकर काम पाहत आहेत. त्या ठिकाणीही त्यांनी इंदोरी येथील गुन्हेगारी मोडीत काढली. देहूरोड विभागात गेले दीड वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या सुमारे पन्नास ते साठ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करून आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे. ही महाराष्ट्रातील मोक्का कायद्यांतर्गत मोठी कारवाई आहे. त्यांच्या तपास पद्धतीवर आजपर्यंत रूपांतरित करून पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 

शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान 
गणपतराव सदाशिव माडगूळकर यांचे प्राथमिक शिक्षण आटपाडी तालुक्यातील माडगूळे गावी झाले आहे. माध्यमिक शिक्षण देवापूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहात झाले आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण हे पुणे कृषी महाविद्यालय व उच्च शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झाले आहे. त्यांनी हे शिक्षणही कमवा आणि शिका योजनेत घेतले होते. त्याचे वडील शेतकरी होते. 

एका गावात दुस-यांदा पुरस्कार 
सतत दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  आटपाडी तालुक्यातील माडगूळे गावाला दोन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यापूर्वी महाकवी व आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर गणपतराव माडगूळकर यांना त्यांच्या सेवेबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे माडगूळे गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गणपतराव माडगूळकर, सहायक पोलीस आयुक्त, देहूरोड विभाग :

महाकवी ग. दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर आहे. एवढे मोठे थोर साहित्यिक गावात जन्माला आले. त्यांचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यांचे आणि गावाचे नाव मोठे करायचे हे माझे ध्येय आहे. त्या अनुषंगाने मी काम करत राहिलो. विशेष म्हणजे त्यांच्याच भावजय कालिंदी माडगूळकर मला प्राथमिक शाळेत शिकवायला होत्या. गावाच्या सततच्या दुष्काळी परिस्थतीने मला झगडण्याची ताकत दिली.

Web Title: Ganpatrao Madgulkar's special interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.