कचरा गाडीत भरली माती
By Admin | Published: May 26, 2017 06:09 AM2017-05-26T06:09:05+5:302017-05-26T06:09:05+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदाराने वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये चक्क माती भरल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला
लोकमत न्यूज नेटवर्क
निगडी : पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदाराने वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये चक्क माती भरल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. निगडीच्या नगरसेविका कमल घोलप यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. मातीने भरलेला डंपर महापालिकेत आणला होता.
महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांचा घरोघरचा कचरा उचलला जात आहे. निगडी, ओटास्कीम येथून वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये (एमएच १२ आरए ९००३) गेल्या अनेक दिवसांपासून माती भरत असल्याच्या तक्रारी नगरसेविका कमल घोलप यांच्याकडे आल्या होत्या. आज कचरा गोळा करणारे कर्मचारी निगडी येथे डंपरमध्ये माती भरत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांच्याकडे डंपरमध्ये माती का भरता, असे विचारले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर हा डंपर त्यांनी महापालिकेत आणला. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, आरोग्य अधिकारी मिनीनाथ दंडवते यांना या प्रकरणाची त्यांनी माहिती दिली आहे.
या ठेकेदारावर कडक कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच या डंपरचे वजन किती आहे, याची माहिती घेऊन त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्याची मागणी नगरसेवक कमल घोलप, उत्तम केंदळे यांनी केली आहे.
नगरसेवकांच्या तक्रारीनंतर संबंधित प्रकरणाची दखल घेतली आहे. कचरा गोळा करणाऱ्या संस्थेला नोटीस देण्यात येणार असून दंड आकारणी करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी दिली.