अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा ‘कचरा’
By admin | Published: May 6, 2017 02:24 AM2017-05-06T02:24:36+5:302017-05-06T02:24:36+5:30
प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका पिछाडीवर गेली
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका पिछाडीवर गेली आहे. याबाबत आरोग्य विभागातील अधिका-यांच्या अकार्यक्षमतेचा कचरा साफ करण्याची आवश्यकता आहे, अशी नाराजी शहरातील विविध पक्षीय नेत्यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या यादीतील टॉप टेनमध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आणि राज्यात पहिला क्रमांक आला होता. त्यामुळे स्वच्छतेबाबतच्या पिंपरी-चिंचवड पॅटर्नचा अभ्यास इतर शहरांनी केला होता. या वर्षीच्या निकालात पिंपरी-चिंचवड पिछाडीवर गेले आहे. देशात ७२ वा आणि राज्यात पिंपरीचा पाचवा क्रमांक आला आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भाजपाचे पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ भारत स्पर्धेत शहराला कमी गुण मिळाले ही निश्चितच क्लेषदायी बाब आहे. हे मूल्यांकन झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाचे आहे. त्यांनी लक्ष न दिल्यानेच शहराला अपयश आले आहे.’’
स्वच्छतेच्या बाबतीत थेट ७२व्या क्रमांकावर घसरण झाली, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. याला महापालिका अधिकारीच जबाबदार आहेत. त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून अपयश आले. त्यांच्यामुळे शहरवासीयांची शरमेने मान खाली गेली आहे. कचऱ्याविषयी ज्या संस्था काम करतात. त्याच बोगस आहे. - नितीन काळजे, महापौर
स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडला अपयश का आले, याची कारणे शोधून प्रभावी उपाययोजना केल्या जातील. पिंपरी-चिंचवड हे चांगले शहर असून, तीन गोष्टींवर भर देणार असून, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, वाहतूक व विघटन यावर लक्ष देणार आहे. दोन वर्षांत शहर कचरामुक्ततेसाठी प्रयत्न करेल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त
भाजपाच्या नाकर्तेपणाचे उत्तम उदाहरण आहे. केवळ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार सत्ताधारीही तितकेच जबाबदार आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासनाने याविषयी गांभीर्याने नियोजन केले नाही. परिणामी आपल्याला अपयश आले ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
स्वच्छ स्पर्धेसाठी गुणांक झाले कमी स्वच्छ स्पर्धेबाबत लक्ष न दिल्याने गुणांकनात शहर पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे देशातील टॉप टेनची पंरपरा खंडित झाली आहे. स्वच्छ शहराबाबतच्या स्पर्धेकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष झाले. परिणामी गतवर्षींच्या गुणांमध्ये घट झाली. आरोग्य विभागाडेकही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
- राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना
महापालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर पहिली भेट शहरवासीयांना दिली आहे. स्वच्छ भारतमध्ये शहराचा कचरा केला. याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. शहरातील कचरा कमी करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. शहरवासीयांसाठी अच्छे दिन जरी आले नाहीत, तर यापेक्षा बुरे दिन येऊ नयेत, याची दक्षता भारतीय जनता पक्षाने घ्यायला हवी.
- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस