खडकीतील एचई कारखान्यात वायू गळती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 04:53 PM2018-12-01T16:53:33+5:302018-12-01T16:55:29+5:30
येथील एचई (हाय एक्सप्लोझीव्ह) कारखान्यात सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास वाहिनीला अचानक गळती झाली. सोडियम नायट्रेट या विषारी वायू गळतीने शेजारील अम्यूनेशन फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना उलट्या होणे, चक्कर येणे, मळमळ होणे असे त्रास झाला.
खडकी : येथील एचई (हाय एक्सप्लोझीव्ह) कारखान्यात सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास वाहिनीला अचानक गळती झाली. सोडियम नायट्रेट या विषारी वायू गळतीने शेजारील अम्यूनेशन फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना उलट्या होणे, चक्कर येणे, मळमळ होणे असे त्रास झाला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना एएफके रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव फॅक्टरीतील सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना कारखान्याच्या बाहेर सोडून देण्यात आले. याबाबतची माहिती खडकी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. एएफके रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पी. आर. मलिक म्हणाले, ‘‘रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना उलट्या होणे, चक्कर येणे, मळमळ होणे असा त्रास होत होता. त्यांना आम्ही आॅक्सिजन पुरवठा करून सलाईन लावले. तसेच इन्हेलर दिले आहे. काही रुग्णांना बरे वाटत असल्यामुळे घरी सोडून दिले. आता ४२ महिला आणि पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत.’’