मेट्रोचे काम सुरू असताना गॅसगळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:37 AM2017-08-09T03:37:30+5:302017-08-09T03:37:30+5:30
पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी सीएमई हॅरिस पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास एमएनजीएल वायुवाहिनीतून गळती झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी सीएमई हॅरिस पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास एमएनजीएल वायुवाहिनीतून गळती झाली. वायुगळती नियंत्रणात आणल्याने या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरासाठी महामेट्रोचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी महापालिका परिसरात काम सुरू आहे. सीएमई हॅरिस पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. पाया किती दणकट आहे हे जाणून घेण्यासाठी १०० मीटर अंतरावर खड्डे खणले जात आहेत. तसेच तांत्रिक सर्वेक्षण सुरू आहे. त्याचबरोबरच ड्रिलिंग मशिन आणि कामगारांच्या मदतीने दीड मीटर खोल खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. त्याच ठिकाणी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ठेकेदार ड्रिलिंग करीत असताना एमएनजीएलच्या वाहिनीस धक्का लागला. त्यातून वायुगळती होत असल्याचे कर्मचाºयांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच मेट्रो प्रकल्प अधिकारी, वाहतूक पोलीस, अग्निशामक दलाचे जवान आणि गॅसवाहिनीचे कर्मचारी दाखल झाले.
वाहिनीबाबत माहिती नसल्याने गळती
मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होण्याअगोदर ज्या मार्गावरून मेट्रो धावणार आहे, त्या मार्गावर जिओटेक्निकल सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी या भागात कोणत्याही प्रकराची वायुवाहिनी असल्याचे पुरावे अथवा नकाशे, फलक आढळले नाहीत. शिवाय संबंधित विभागाकडूनही या वायुवाहिनीबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मेट्रोला दिली नव्हती. वायुवाहिनीबद्दलचा कोणताच माहितीफलक अथवा नकाशा या ठिकाणी नसल्याने खोदकाम करताना वायुगळती झाल्याचे मेट्रोचे म्हणणे आहे.