गॅस रिफिलिंग बनतेय स्फोटांची केंद्रे, उद्योगनगरीत गोरखधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:45 AM2018-04-05T03:45:16+5:302018-04-05T03:45:16+5:30
नामांकित गॅस कंपन्यांचे सिलिंडर घ्यायचे...त्यातील गॅस काढून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरायचा...कमी वजनाचे सिलिंडर ग्राहकांना विक्री करायची...काळ्या बाजाराच्या सिलिंडर विक्रीतून बक्कळ कमाई करायची...असा गोरखधंदा शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
पिंपरी - नामांकित गॅस कंपन्यांचे सिलिंडर घ्यायचे...त्यातील गॅस काढून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरायचा...कमी वजनाचे सिलिंडर ग्राहकांना विक्री करायची...काळ्या बाजाराच्या सिलिंडर विक्रीतून बक्कळ कमाई करायची...असा गोरखधंदा शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काळ्या बाजाराने गॅसविक्री करणारे रॅकेट सक्रिय असून लोकवस्तीच्या भागात अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंगची बेकायदा सेंटर उघडलेली आहेत. ही सेंटर बॉम्ब स्फोटासारखी केंद्र बनल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
चिखली येथे गॅस रिफिलिंग करताना झालेल्या स्फोटात आजूबाजूच्या दुकानांचे मोठे नुकसान झाल्याची घटना गतवर्षी घडली. रस्त्याने जाणाºया भगवान हिंगे या महापालिका कर्मचाºयाचा या दुर्घटनेत जीव गेला. ही घटना घडल्यानंतर अशा प्रकारांवर नियंत्रण येईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र अशा प्रकारची बेकायदा आणि धोकादायक गॅस रिफिलिंग सेंटर शहराच्या विविध भागांत थाटली गेली आहेत. राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्ती या रॅकेटमध्ये असल्याने अधिकाºयांना ठोस कारवाई करण्यास अडचणी येत आहेत. वाल्हेकरवाडीतील गॅस रिफिलिंग सेंटरमध्ये सुमारे ३०० सिलिंडरचा साठा पुरवठा अधिकाºयांना आढळून आला.
यापूर्वी बेकायदा गॅसचा साठा करून बाजारात चढ्या भावाने विक्री करणाºया एकाला चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. चिंचवडेनगर येथे ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीकडून तीन मोठे आणि १२ लहान सिलिंडर जप्त केले. प्रल्हाद बाबूराव पाटील (वय २१, रा. नºहेगाव) या आरोपीसह १५ सिलिंडर जप्त केले होते. त्या वेळी पुरवठा अधिकारी लक्ष्मण मारुती भांगे (वय ५५, रा. कामगारनगर, पिंपरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार रहाटणी-काळेवाडी रस्त्यावर उघडकीस आला आहे. मुद्देमालासह एका जणाला पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. रहाटणी- काळेवाडी रस्त्यावरील सिद्धनाथ गॅस सर्व्हिस या ठिकाणी घरगुती वापराचे गॅस सिलिंडर तीनचाकी टेम्पोमधून, सिद्धनाथ गॅस सर्व्हिस या दुकानात खाली करण्यात येत होते. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर पुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत ओव्हाळ यांनी कारवाई केली होती.
वाल्हेकरवाडीमध्ये बेकायदा साठा जप्त
पिंपरी : लोकवस्तीच्या ठिकाणी धोकादायकरित्या गॅस रिफिलिंग प्रक्रिया, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर असलेला गॅस साठा एक प्रकारे बॉम्बस्फोटाचे केंद्रच ठरू शकते. अशी बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्र शहरात ठिकठिकाणी सुरू आहेत. याबद्दलची तक्रार येताच, पुरवठा अधिकाºयांनी वाल्हेकरवाडीत एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग केंद्रावर बुधवारी सकाळी छापा टाकला. तेथे विविध कंपन्यांचे सुमारे ३०० सिलिंडर आढळून आले.
अधिकाºयांनाच आपले कर्मचारी सुरक्षित आहेत का? असा उलट प्रश्न गॅस रिफिलिंग केंद्राशी संबंधित टोळक्याने उपस्थित केला. त्यामुळे कारवाई करण्याबाबत अधिकाºयांपुढे पेच निर्माण झाला. पुरवठा अधिकारी गणेश सोमवंशी वाल्हेकरवाडी येथे पोहोचले. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, एका पत्राशेडमध्ये गेले. तेथे मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर ठेवलेले आढळले. पोलीसही तेथे आले. सिलिंडर जप्तीची कारवाई केली. या गॅस रिफिलिंग केंद्राचा मालक कोण? याबद्दल कोणीच काही सांगत नव्हते.
नायब तहसीलदार आणि पुरवठा अधिकाºयांशी हुज्जत घालणारा कोण होता? याची माहिती घेण्यात येत होती.
अधिकाºयांना बांगड्यांचा आहेर
छावा मराठा युवा महासंघाने २७ ला आंदोलन केले होते. घरगुती गॅसचा काळा बाजार होत असून पुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप करून छावा मराठा युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार कार्यालयातील अधिकाºयांना बांगड्यांचा आहेर दिला होता. धनाजी येळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले होते़ त्याची गंभीर दखल घेत वाल्हेकरवाडीतील गॅस रिफिलिंग केंद्रावर बुधवारी अधिकाºयांनी कारवाई केली.
गुन्हा दाखल करण्यास अडचणी
वरिष्ठ पातळीवरून दबाव वाढू लागल्याने गुन्हा दाखल करण्यास अडचणी येऊ लागल्या. पुरवठा अधिकाºयांनी तक्रार दिल्यास गुन्हा नोंदविण्याची पोलिसांची तयारी आहे. अशी भूमिका पोलिसांनी घेतली तर पुरवठा अधिकाºयांनी सिलिंडर जप्तीची कारवाई केली, पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका पुरवठा अधिकारी व नायब तहसीलदारांनी घेतली.
तुमचे कर्मचारी
सुरक्षित आहेत का ?
जप्त केलेला गॅस सिलिंडरचा साठा आकुर्डीतील तहसील कार्यालयाच्या आवारात नेण्यात आला. त्यानंतर मात्र वेगळेच चित्र अधिकारी आणि नागरिकांना पहावयास मिळाले. बंदूकधारी सहा बाऊन्सर घेऊन एक व्यक्ती तहसीलदार कार्यालयाजवळ दाखल झाली. कारवाई करण्याचे कारण काय? असा जाब त्या व्यक्तीने नायब तहसीलदार दिनेश तावरे यांना विचारला. अशा पद्धतीने गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा करणे दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकते. या कारणास्तव कारवाई केली असल्याचे तावरे यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करताय, तुमचे कर्मचारी सुरक्षित आहेत का? असा उलट प्रश्न करताच जमलेले नागरिक आश्चर्य व्यक्त करू लागले. या वेळी अधिकृत गॅस एजन्सीचे काही मालकही त्या ठिकाणी हजर झाले. आमचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, असे सांगत त्यांनी जबाबदारी झटकली.