गॅस भरणा ठिकाण बॉम्बस्फोटाचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:45 AM2019-01-08T00:45:53+5:302019-01-08T00:46:11+5:30
अत्यंत धोकादायक पद्धतीने एका सिलिंडरमधून दुसºया सिलिंडरमध्ये गॅस भरला जातो. बेकायदा चालविण्यात येणारी गॅस रिफिलिंग केंद्र भविष्यात एक प्रकारे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची केंद्र होणार असून, वेळीच अशा प्रकारावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.
शहरात ठिकठिकाणी बेकायदा गॅस भरणा केंद्र उघडण्यात आली आहेत. पत्राशेडवजा खोलीत हे उद्योग चालविले जातात. अशा ठिकाणी गॅस सिलिंडर स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. बेकायदा रिफिलिंग केंद्रातून केटरिंगवाले, खाणावळ, हॉटेलचालक यांनाही मोठ्या प्रमाणावर सिलिंडरचे वितरण होते. या ठिकाणीही गॅसगळती होऊन स्फोटाच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे वेळीच या प्रकारावर नियंत्रण आणले नाही तर गॅस रिफिलिंगची ठिकाणे भविष्यात बॉम्ब स्फोटाची केंद्र बनतील, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
तळवडे हद्दीत भांड्यांची विक्री करणाऱ्या एका दुकानदाराकडील बेकायदा गॅस भरणा केंद्रात सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडर फुटून उडालेले लोखंडी तुकडे रस्त्याने जाणाºया एकाच्या डोक्यात लागले. देहूगाव येथे राहणाºया व्यक्तीचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर अशा प्रकारे बेकायदा गॅस रिफिलिंग करणाºयांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र अशा केंद्रांवर कारवाई होऊ शकलेली नाही. मागील आठवड्यात नवी सांगवी येथील एका बिर्याणी हाऊसमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. हॉटेलमधील साहित्य तसेच तथे उभ्या केलेल्या मोटारीचे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
गॅस स्फोटाच्या घटनेप्रकरणी संबंधितांवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र त्यांच्याकडे असे सिलिंंडर आले कोठून? याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही. पोलिसांनी त्यांची कारवाई केली. महसूल विभागाच्या अधिकाºयांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून बेकायदा गॅस भरणा केंद्रांवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. गॅस कंपन्यांचे सिलिंडर काळ्या बाजाराने मिळवायचे, ते सिलिंडर रिफिलिंग केंद्रात न्यायचे, त्या सिलिंडरमधील गॅस दुसºया सिलिंडरमध्ये भरायचा. कंपनीकडून आणलेल्या एका सिलिंडरमधील गॅस दोन तीन सिलिंडरमध्ये भरून हॉटलेवाले, दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रेते यांना त्या सिलिंडरची विक्री करायची. कमी प्रमाणात गॅस भरलेले सिलिंडर ग्राहकांच्या माथी मारायचे, फसवेगिरीतून बक्कळ कमाई करायची, असा हा गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा शहरात राजरोसपणे सुरू आहे. तुकारामनगर, वायसीएम रुग्णालय परिसर, शिवाजी चौक येथील हॉटेल व टपरीधारकांवर कारवाई करून बेकायदा साठा केलेले ३२ गॅस सिलिंडर अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकाºयांनी जप्त केले होते.
खडकीतसुद्धा गॅस ग्राहकांना लुबाडणारे टोळके पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते. आरोपींनी गॅसधारकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने सिलिंडरचे सील तोडून दुसºया वेगळ्या टाकीत गॅस काढून घेतला. स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता त्यांनी हे कृत्य केले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू कायद्यातील तरतुदीनुसार खडकी पोलिसांनी दोघांवर कारवाई केली होती. गॅस एजन्सीतून भरून आणलेले गॅस सिलिंडर ग्राहकांना वितरीत करण्यापूर्वी त्यातील गॅस आरोपी दुसºया सिलिंडरमध्ये काढून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्र आणि काळ्या बाजाराने गॅस विक्री करणारे यांचे संगनमताचे रॅकेट शहरात सक्रिय आहे. काळ्या बाजाराने गॅसविक्री करणाºयांचे रॅकेट शहरभर विस्तारले आहे. केटरर्स, कॅन्टीनचालक, खाणावळवाले हेच बेकायदा गॅस रिफिलिंगवाल्यांचे ग्राहक आहेत. विवाह सोहळ्यातील जेवण तयार करण्यासाठी ज्या केटरर्सला काम दिले जाते. ते केटरर्स कार्यमालकांना गरजेपेक्षा अधिक सिलिंडर घेण्यास भाग पाडतात. अशा वेळी केटरर्स मागणी करतील तेवढे सिलिंडर उपलब्ध करून देणे भाग पडते. अथवा केटरिंगवाले स्वत:स हवे तेवढे सिलिंडर मिळवून देण्याची हमी देतात. एवढेच नव्हे हवे तेवढे सिलिंडर मिळवतात. सिलिंडरचा काळा बाजार करणारी यंत्रणाच कामी येत असल्याने एकाच दिवशी त्यांना पाहिजे तेवढे सिलिंडर त्यांना सहज मिळतात.
केवळ बेकायदा गॅस रिफिलिंग सेंटरच नव्हे तर या रिफिलिंग केंद्रातून ज्या ठिकाणी गॅस सिलिंडर वितरित होतात. त्या ठिकाणी सार्वजनिक सुरक्षिततेला धोका पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. अत्यंत बेजबाबदारपणे एका सिलिंडरमधून दुसºया सिलिंडरमध्ये गॅस भरल्यानंतर त्याचे पॅकिंग योग्य प्रकारे होत नाही. यामध्ये दाखविलेल्या निष्काळजीपणाबद्दल त्यांना वेळीच जाब विचारणारी सक्षम यंत्रणा नाही. याचाच गैरफायदा उठवून राजरोसपणे ठिकठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्र थाटण्यात आली असून, त्यांचा धंदाही तेजित आहे. नागरिकांना विशेषत: महिलांना स्वयंपाक करताना गॅस कसा वापरावा, सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी. याच्या सूचना दिल्या जातात.
बहुतांशी महिला आपल्या कुटुंबासह अन्य कोणाच्याही सुरक्षिततेला बाधा पोहोचू नये याची दक्षता घेतात. अशी दक्षता घेतली तरी बेकायदा रिफिलिंग केंद्रातून ठिकठिकाणी वितरीत होणाºया गॅस सिलिंडरचा कधी कोठे भडका उडेल, स्फोट होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे स्वत: सुरक्षिततेची कितीही काळजी घेतली तरी जोपर्यंत बेकायदा गॅस रिफिलिंगवाल्यांवर कारवाई होत नाही, त्यांच्या मनातील भीती दूर होणार नाही.