पिंपरी चिंचवड शहर परिसरात गोडावूनमध्ये सुरू होती गॅसची चोरी; गुन्हे शाखेने दोघांच्या आवळल्या मुसक्या
By नारायण बडगुजर | Published: January 25, 2024 05:46 PM2024-01-25T17:46:22+5:302024-01-25T17:47:11+5:30
पिंपरी : व्यावसायिक व घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून मोकळ्या सिलिंडरमध्ये भरून चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली. यात ...
पिंपरी : व्यावसायिक व घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून मोकळ्या सिलिंडरमध्ये भरून चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली. यात पोलिसांनी एक लाख ९६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चिखलीतील जाधववाडी -शिव रस्ता येथे साईराज फेब्रीकेशनच्या शेजारील पत्र्याच्या गोडावूनमध्ये मंगळवारी (दि. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई केली.
भुजंगनाथ दिलीप पाटील (वय २८), संभाजी बालाजी उपासे (२४, दोघेही रा. रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २४) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील आणि उपासे या दोघांनी घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरमधील गॅस मोकळ्या सिलिंडरमध्ये भरत होते. या गॅस चोरीबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली. यात व्यावसायिक वापराचे तीन व एक रिकामा सिलिंडर, तसेच घरगुती वापराचे भरलेले ३४ व १७ रिकामे सिलिंडर, गॅस रिफिलिंगचे तीन सर्किट, एक इलेक्ट्राॅनिक वजनकाटा, असा एकूण एक लाख ९६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.