"गौतमी पाटील करते ती लावणी नाही, ते तर..."; सुरेखा पुणेकर यांनी सोडला टीकेचा 'बाण'

By नारायण बडगुजर | Published: March 19, 2023 10:07 PM2023-03-19T22:07:56+5:302023-03-19T22:09:06+5:30

Gautami Patil vs Surekha Punekar: गौतमी पाटील सध्या तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनल्याचं दिसतंय

Gautami Patil do not dance on Lavani it can be said DJ Dance says legendary artist Surekha Punekar | "गौतमी पाटील करते ती लावणी नाही, ते तर..."; सुरेखा पुणेकर यांनी सोडला टीकेचा 'बाण'

"गौतमी पाटील करते ती लावणी नाही, ते तर..."; सुरेखा पुणेकर यांनी सोडला टीकेचा 'बाण'

googlenewsNext

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: कलावंत पोट भरण्यासाठी धडपडतो. पोटासाठी प्रत्येकजण काहीतरी करतो. मात्र जे करायचे आहे, ते चांगले करावे, असे मत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले. तसेच गौतमी पाटील हिची लावणी नसून डीजे डान्स आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

चिंचवड येथे २५ आणि २६ मार्चला राज्यस्तरीय महालावणी स्पर्धा होणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी रविवारी चिंचवड येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सुरेखा पुणेकर बोलत होत्या. भाजपच्या आमदार उमा खापरे, महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यावेळी उपस्थित होत्या.

सुरेखा पुणेकर म्हणाल्या, लावणीचे अनेक प्रकार आहेत. आजच्या तरुण कलावंतांनाी लावणी समजून घेतली पाहिजे. ती शिकून घेतली पाहिजे. माझ्याकडे आल्यास त्यांना मी लावणी शिकवू शकते. कलावंत असलेल्या तरुणींनी अंगभर कपडे घालून लावणीमधून कला सादर करावी. त्यामुळे ही कला जिवंत राहण्यास मदत होईल. त्यासाठी लावणी आजच्या पिढीपर्यंत पोहचविली पाहिजे. मात्र, काही कलावंत तसे करताना दिसत नाही. मात्र, आपण लावणीची विटंबना होऊ देणार नाही.

तमाशाचा आर्केस्ट्रा केलाय...

लावणीमध्ये सवाल-जवाब हा प्रकार सध्या पहायला मिळत नाही. त्यासाठी कलावंतांनी प्रयत्न केले पाहिजेत. तमाशाचेही असेच झाले आहे. सध्या तर तमाशाचा आर्केस्ट्रा झाला आहे. तमाशातील वग हा प्रकार मागे पडत आहे. याला कलाकारच जबाबदार आहेत. आपण आपली पारंपरिक कला लोकांपर्यंत पोहचविली पाहिजे, असे आवाहन सुरेखा पुणेकर यांनी केले.

कथ्थक व लावणी जुळ्या बहिणी

लावणी हा एक उत्तम कलाप्रकार आहे. तसेच नृत्यामध्ये कथ्थक देखील शास्त्रीय कला प्रकार आहे. कथ्थक व लावणी म्हणजे कला प्रकारातील जुळ्या बहिणीच आहेत. लावणी कला टिकून राहण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे, असे मत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Gautami Patil do not dance on Lavani it can be said DJ Dance says legendary artist Surekha Punekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.