गौतमी पाटीलचा 'शो' अन् महिलांची तोबा गर्दी, लावण्यखणीलाही झाला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 09:40 AM2023-03-09T09:40:25+5:302023-03-09T09:46:05+5:30
तिने कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले असून हा मला मिळालेला पहिलाच पुरस्कार असल्याचंही तिने म्हटले.
पिंपरी चिंचवड/पुणे - गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात ट्रेंडिग असलेल्या आणि तिच्या कार्यक्रमांना मोठी मागणी असलेल्या खान्देश कन्या गौतमी पाटीलचा महिला दिनी पिंपरी चिंचवड येथे कार्यक्रम पार पडला. गौतमीच्या या कार्यक्रमाला पुरुषांपेक्षा महिलांचीच गर्दी मोठी होती, त्यामुळे या कार्यक्रमाची वेगळीच चर्चा होतेय. विशेष म्हणजे येथील कार्यक्रमात गौतमीला पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला. त्याबद्ददल तिने कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले असून हा मला मिळालेला पहिलाच पुरस्कार असल्याचंही तिने म्हटले.
पिंपरी चिंचवडमध्ये गौतमी पाटीलचा जिथे कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमास महिलांची मोठी गर्दी होती. विशेष म्हणजे गौतमीच्या गाण्यांवर महिला आणि युवतीही थिरकल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, आपल्याला आनंद झाल्याचं तिने म्हटलंय. तसेच, काही जण कौतुक करतात, माझ्याबद्दल चांगलं बोलतात. पण, काही जण चांगलं म्हणत नाहीत, त्यांना बाय बाय... असे गौतमीने म्हटले. तसेच, ''माझ्या प्रत्येक शोला पुरुषांची संख्या अधिक असते. आज महिलांची संख्या अधिक होती. महिलाही माझ्या नृत्याचा आनंद घेत होत्या. मी एकटीच नृत्य करत होती असं नाही. त्यामुळे मला खूप खूप छान वाटत आहे,'' अशी भावना गौतमी पाटीलने व्यक्त केली.
लोकं चांगलं वाईट बोलतात यासंदर्भात पत्रकारांनी गौतमीला विचारलं असता, ''ज्याचे त्याचे विचार असतात दादा. आज काही लोक एक बोलत आहेत, तर काही लोक दुसरंच काही तरी बोलत आहेत. मला जे चांगलं म्हणतात त्यांना मी धन्यवाद करते आणि जे मला चांगलं म्हणत नाही त्यांना बाय बाय'', असे तिने म्हटले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटीलची सोशल मीडियांत चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. आपल्या ठसकेबाज लावणीने तिने रसिक चाहत्यांवर जादू केलीय. मात्र, तिच्या कार्यक्रमावर बंदी आणावी, अशी मागणीही काहीजण करत होते.