रुग्णांवर उपचार करणे सोडले अन् योगा करत बसले; YCM रुग्णालयातील डॉक्टरांचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 01:16 PM2023-04-27T13:16:54+5:302023-04-27T13:20:01+5:30

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दंड...

gave up treating patients and sat doing yoga Doctors of YCM Hospital pune news | रुग्णांवर उपचार करणे सोडले अन् योगा करत बसले; YCM रुग्णालयातील डॉक्टरांचा प्रताप

रुग्णांवर उपचार करणे सोडले अन् योगा करत बसले; YCM रुग्णालयातील डॉक्टरांचा प्रताप

googlenewsNext

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. रुग्णांवर उपचार करण्याचे सोडून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी भरदुपारी चक्क योगा करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर आयुक्त शेखर सिंह यांनी दंडात्मक कारवाई करत कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे.

वायसीएम रुग्णालयात पुणे जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या रुग्णांवर उपचार करण्याच्या वेळेत वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी रुग्णालयातील एका हॉलमध्ये दोन तास योगा करत बसल्याचे नातेवाईकांना आढळले. संबंधित नातेवाईकांनी त्यांना याबाबत हटकले होते. ‘आमच्या रुग्णांकडे तुम्ही लक्ष द्या, त्यांच्याकडे कोणी बघत नाही’, असे एका नातेवाईकाने या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, त्यांना उलट उत्तर देत संबंधित नातेवाईकांना या अधिकाऱ्यांनी जायला सांगितले. त्यानंतर नातेवाईकाने महापालिकेकडे याबाबत तक्रार केली. सामान्य प्रशासन विभागाच्या पथकाने वायसीएम रुग्णालयामध्ये अचानक जाऊन याची तपासणी केली. त्यावेळी हे डॉक्टर हॉलमध्ये योगा करत असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार प्रशासनाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडे याबाबत माहिती मागवली. त्यामध्ये त्यांनी अशाप्रकारे कामाच्या वेळी योगा प्रशिक्षण केंद्रास कोणत्याही प्रकारची मान्यता दिली नसल्याचे लेखी दिले. त्यामुळे या डॉक्टरांना प्रशासनाने लेखी खुलासा करण्यास सांगितले. त्यावर सादर केलेला खुलासा संयुक्तिक नसल्याने प्रशासन विभागाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना असलेला पगार याची तासानुसार विभागणी करण्यात आली. त्यानुसार त्यांनी दोन महिने प्रत्येक दिवशी दोन तास योगा केल्याने त्यानुसार त्यांना दंड आकारण्यात आला आहे.

‘या’ अधिकाऱ्यांना आकारला दंड
वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा जावळे यांना ५३ हजार ३५६ रुपये दंड करण्यात आला आहे. तसेच ग्रंथपाल कम लिपिक प्रतिभा मुनावत यांना २२ हजार ३२, लिपिक सुषमा जाधव यांना १० हजार ४३२, सह भांडारपाल कविता बहोत यांना ११ हजार ९०४, शिपाई शमलता तारू यांना ११ हजार ८९६ इतका दंड करण्यात आला आहे. तसेच स्टाफ नर्स असलेल्या सविता ढोकले, नूतन मोरे व नीलिमा झगडे यांनी ड्युटी संपल्यानंतर रुग्णालयात योगा केल्याने त्यांना प्रत्येकी २०० रुपये दंड आकारला आहे.

प्रशासन विभागाकडे याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. विभागाने तपासणी केली असता हे कर्मचारी रुग्णांवर उपचार करण्याचे सोडून योगा करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यावर आयुक्तांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.

 

कामाच्या वेळेत योगा करणे चुकीचे आहे. काही कर्मचारी काम संपल्यानंतर योगा करत होते. प्रशासन विभागाच्या तपासणीमध्ये हे उघड झाल्याने त्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई प्रशासन विभागाने केली आहे.
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.

Web Title: gave up treating patients and sat doing yoga Doctors of YCM Hospital pune news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.