उद्योगनगरीला जीबीएसचा विळखा; वैद्यकीय विभाग अलर्ट, रुग्णांची संख्या १ २ वर
By प्रकाश गायकर | Updated: January 23, 2025 17:36 IST2025-01-23T17:36:14+5:302025-01-23T17:36:48+5:30
शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण आढळत आहेत.

उद्योगनगरीला जीबीएसचा विळखा; वैद्यकीय विभाग अलर्ट, रुग्णांची संख्या १ २ वर
पिंपरी :पुणे शहरासह उद्योगनगरीमध्ये एका नवीन आजाराने डोके वर काढले आहे. शहरात गेल्या काही दिवसांत गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे १२ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये अचानक सुन्नपणा येणे, हाता पायांना मुंग्या येऊन स्नायू कुमकुवत होतात. या आजाराची परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण आढळत आहेत. मात्र, मंगळवारपासून त्यामध्ये अचानक वाढ झाली. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, शीघ्र कृती दल, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी यांची तातडीची बैठक पार पडली. यामध्ये आजाराचा प्रसार, संसर्गाचा स्त्रोत, रुग्णांची आणि नमुन्यांची तपासणी याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. तसेच रुग्ण आढळलेल्या परिसरामध्ये पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
दरम्यान, शहरात गुरूवार (दि. २३) पर्यंत १२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४ रुग्णांची नोंद संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात झाली आहे. आतापर्यंत महापालिका व खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या १२ रुग्णांपैकी ६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सहा रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
कोणत्या भागात किती रुग्ण
ठिकाण - रुग्ण - बरे झालेले रुग्ण
संत तुकारामनगर - ५ - २
मोशी - ३ - २
चिखली - १ - ०
कासारवाडी - २ -१
वाकड - १ - १
काय आहेत लक्षणे?
१) हातापायातील ताकद कमी होणे
२) हातापायाला मुंग्या येणे
३) गिळण्यास व बोलण्यास त्रास होणे
४) धाप लागणे व श्वास घेण्यास त्रास होणे
काय काळजी घ्यावी
१) पाणी उकळून व गाळून प्यावे
२) उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे
३) हातापायांच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास तपासणी करून घ्यावी.
हा आजार नवीन नसून यापूर्वी देखील या आजाराचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे आढळल्यास तातडीने महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणी करावी. या आजारासाठीची सर्व औषधे महापालिका रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी देखील रुग्ण आढळल्यास तातडीने महापालिकेला कळवावे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी