सोशल मीडियावर सर्रास वाङ्मयचौर्य

By admin | Published: July 17, 2017 04:12 AM2017-07-17T04:12:15+5:302017-07-17T04:12:15+5:30

प्रत्येकामध्ये लेखक, कवी किंवा साहित्यिक दडलेला असतो. कोणाला छान कविता, कथा सुचते तर कोणी एखाद्या घटनेचे छान विश्लेषण करते...

The general broadcasts on social media | सोशल मीडियावर सर्रास वाङ्मयचौर्य

सोशल मीडियावर सर्रास वाङ्मयचौर्य

Next

प्रज्ञा-केळकर-सिंग।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रत्येकामध्ये लेखक, कवी किंवा साहित्यिक दडलेला असतो. कोणाला छान कविता, कथा सुचते तर कोणी एखाद्या घटनेचे छान विश्लेषण करते... आपले लेखन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडले जाते ते सोशल मीडियाचे माध्यम. एखादा रसिक आपली कविता, लेखन आवडीने शेअर करतो, तेव्हा आपल्याला आनंदच होतो...मात्र, एखादे वेळी आपलेच लेखन तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने सोशल मीडियावर दृष्टीस पडते, तेव्हा मोठा धक्का बसतो. आजकाल सोशल मीडियावर वाङ्मयचौर्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. आपण कॉपीराईट कायद्याचा भंग करत आहोत, हे या ‘वाङ्मयचोरां’च्या ध्यानीमनीही नसते. अशा परिस्थितीत मूळ लेखकाला कॉपीराईट कायद्याचा भंग झाल्याची रीतसर तक्रार करता येऊ शकते. मात्र, जनजागृतीअभावी अशा प्रकारे तक्रारी नोंदवल्या जाण्याचे प्रकार केवळ १०-२० टक्केच आहे.
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे सोशल मीडिया... आपले विचार, लेखन, विश्लेषण सोशल मीडियावर व्यक्त करुन त्यातून चर्चा, मार्गदर्शन आणि विचारमंथन घडावे, यादृष्टीने अनेक उदयोन्मुख लेखक सोशल मीडियावर सक्रिय असतात. एखाद्याचा विशिष्ट विषयामध्ये हातखंडा असतो. कोणाला सामाजिक, राजकीय परिस्थितीवर उत्तम भाष्य करता येते, तर कोणाचा ललित लेखनात हातखंडा असतो. प्रत्येकाला आपले पुस्तक किंवा लिखाण प्रकाशित करणे जमेलच असे नाही. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ब्लॉग आदींच्या माध्यमातून लिखाणाला नवे धुमारे फुटत असतात. बरेचदा, एखादी व्यक्ती मूळ लेखकाची परवानगी न घेता हे लिखाण त्याच्या वॉलवरुन कॉपी करून स्वत:च्या वॉलवर, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अथवा एखाद्या प्रकल्पामध्ये पेस्ट करुन वाहवा मिळवते. येनकेनप्रकारेण, आपल्या लेखनाची चोरी होत असल्याचे मूळ लेखकाच्या निदर्शनास आल्यानंतर धक्का बसतो, चिडचिड आणि मनस्ताप पदरी पडतो.
बरेचदा मूळ लेखक कॉपी, पेस्ट केलेल्या लेखनाचे स्क्रीन शॉट काढून ते शेअर करुन असे प्रकार उघडकीस आणताना दिसत आहेत. त्यामुळे वाङ्मयचौर्याला अल्प प्रमाणात आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, याबाबत अधिक जागरूकता आणि सावधगिरी बाळगून रीतसर तक्रार नोंदवता येऊ शकते. कायद्याच्या चौकटीतून अशा प्रकारांना आळा घालता येतो, असे मत आयटी कायद्याच्या जाणकार वकील अ‍ॅड. वैशाली भागवत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
प्रत्यक्ष लेखनाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक लेखनालाही साहित्याचा दर्जा आपोआप प्राप्त होतो. कोणत्याही प्रकारची नोंदणी न करताही या लेखनाला स्वामित्वहक्क प्राप्त होतो. यामध्ये लेखनाचा, भाषांतराचा, नवनिर्मितीचा समावेश होतो. त्यामुळेच सोशल मीडियावरील
लेखन अथवा आशयाला कॉपी
राईट आणि आयटी कायदा लागू होतो. मूळ लेखनाची कोणीही चोरी केल्यास, लेखकाचे नाव बदलून स्वत:च्या नावाने पोस्ट केल्यास, डाऊनलोड केल्यास अथवा हे लेखन कोणत्याही प्रकारे जसेच्या तसे वापरल्यास कॉपीराईट कायद्याच्या ६३ (ब) कलामांतर्गत आणि आयटी कायद्याच्या ४३ब (ब) या कलमांतर्गत गुन्हा अथवा तक्रार नोंदवली जाऊ शकते.
बरेचदा एखादी कथा अथवा लेखन जसेच्या तसे न उचलता त्यातील ठरावीक भाग उचलण्याचे प्रकार घडतात. एखाद्या लेखकाचे लेखन स्वत:च्या नावाने व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवले जाते. अशा परिस्थितीतही कायद्याचा भंग होतो. मात्र, फारसे नेटिझन्स याबाबत तक्रार दाखल करण्याबाबत उत्सुकता दाखवत नाहीत. माझ्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागेल, कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील, पैसे आणि वेळ खर्च होईल, अशी यामागची मानसिकता असते. मात्र, तरुणांनी याबाबत जागरूकता बाळगणे गरजेचे असल्याचे मत अ‍ॅड. वैशाली भागवत यांनी व्यक्त केले.

Web Title: The general broadcasts on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.