सर्वसाधारण सभेत महापौर, उपमहापौर निवड होणार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:44 AM2018-08-04T03:44:48+5:302018-08-04T03:44:56+5:30
पिंपरी : महापौर व उपमहापौरपदासाठी शनिवारी निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सकाळी अकराला निवड होणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजपाच्या वतीने प्रयत्न सुरू झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाकडून महापौरपदासाठी राहुल जाधव यांनी, तर उपमहापौरपदासाठी सचिन चिंचवडे यांनी अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुक्रमे विनोद नढे व विनया तापकीर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे निवडणूक होणार आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी एकमताने नावे दिल्याने बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत नाही. महापालिकेच्या सभागृहात शनिवारी सकाळी अकराला विशेष सभा होणार आहे. पीठासन अधिकारी म्हणून पीएमपीच्या संचालक नयना गुंडे कामकाज पाहणार आहेत.
निवडणूकप्रक्रिया
सर्वसाधारण सभेत महापौर व उपमहापौर पदासाठी आलेल्या अर्जाची माहिती नगरसचिव देतील. सर्व अर्ज ते अध्यक्षांना सादर करतील. त्यावर ते वैध व अवैध अर्जाची घोषणा करतील. एका पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्याने माघारीसाठी पंधरा मिनिटे वेळ दिला जाणार आहे. अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक घेतली जाईल. उमेदवारांच्या बाजूने प्रत्येक नगरसेवकाला हात वर करून मत द्यावे लागणार आहे.