सौर ऊर्जेतून ३८०० युनिट वीजनिर्मिती; ‘सुमनशिल्प’ ठरली स्मार्ट हाउसिंग सोसायटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:53 AM2018-08-20T01:53:56+5:302018-08-20T01:54:38+5:30
भासदांच्या सहकार्याने आर्थिक बाजूंवर मात करीत महिन्याकाठी तब्बल ३८०० युनिट वीज निर्मिती करणारी ३०.२४ किलोवॉट ग्रिड इन्टरअॅक्टीव्ह सोलर पॉवर प्लान्ट ही सौर ऊर्जा यंत्रणा इमारतीवर लावण्यात आली आहे.
दिघी : स्मार्ट सिटी या संकल्पनेला साजेशी अशी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधील सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारी संकल्पना साकारत प्रत्यक्षात उतरवली आहे दिघीतील आळंदी रोडवरील परांडेनगर सर्व्हे क्रमांक ८५/१/१ मधील सुमनशिल्प फेज क्रमांक एक या सोसायटीने. सभासदांच्या सहकार्याने आर्थिक बाजूंवर मात करीत महिन्याकाठी तब्बल ३८०० युनिट वीज निर्मिती करणारी ३०.२४ किलोवॉट ग्रिड इन्टरअॅक्टीव्ह सोलर पॉवर प्लान्ट ही सौर ऊर्जा यंत्रणा इमारतीवर लावण्यात आली आहे. यामधून निर्माण होणारी वीज बाजारभावानुसार चाळीस हजार रुपये किमतीची आहे. त्यामुळे वीज बिलामध्ये बचत होत आहे. वीज वाचविण्याची दुहेरी किमया साधली आहे. त्यामुळे वीज निर्माण करणारी स्मार्ट सिटीतील स्मार्ट सोसायटी म्हटले तर वावगे ठरू नये.
महावितरण कंपनीला वीजपुरवठा
इमारतीच्या टेरेसवर २७० स्क्वेअर मीटर जागेवर हे सौर ऊर्जेचे पॅनल उभारले आहेत. एक पॅनलची लांबी रूंदी एक बाय दोन अशी असून या पॅनेलमधून ३१५ वॅट्स वीज निर्मिती होते. अशी ही एकुण ९६ पॅनेल बसवून महिन्याला तब्बल तीस हजार दोनशे चाळीस वॅट्स वीज निर्माण होणार आहे. दर दिवसाला दिवसभरात १२० ते १२५ युनिट वीज तयार होणार आहे. ही दिवसभरात तयार झालेली वीज, महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे.
दिवसभरात किती वीज तयार झाली व महावितरण कंपनीने किती वापरली ही आकडेवारी एका मीटरवर नोंद होणार आहे. व नंतर सोसायटीने महावितरण कंपनीची वापरलेली एकुण वीज व सोसायटीने निर्माण केलेली वीज यामधून वजा होऊन शिल्लक राहिलेल्या युनिटचेच बील फक्त सोसायटीला भरावे लागणार आहे. तीन ते चार वर्षांत गुंतवणुक केलेले पैसे वसूल होऊन नंतर ही सेवा मोफत अशीचं होणार आहे. सोसायटीला नावारूपाला आणण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष देवराम शेळके, सचिव विकास जाधव, खजिनदार नितिन हांडे, शंकर कंदले, दिपक घाग, सचिन कुंभार, मोहन राऊत, उमेश नागरगोजे यांनी पुढाकार घेतला आहे.
शून्य कचरा प्रकल्प
सोसायटीतील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प साकारला आहे. हे खत सोसायटीतील बागेतील झाडांना देण्यात येते. खत विक्रीही केली जाते. सेंद्रिय खताचा वापर करून पालेभाज्या, फळभाजांचे उत्पादन घेण्यात येत आहे. इ कचरा वेगळा करण्यासाठी यंत्रणा आहे. देशी वृक्ष लागवड, कबुतरांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी इमारतीवर लावलेल्या जाळ्या, चिमण्यांसाठी घरटे, पाणी, चारा मिळावा अशी सोसायटीच्या आवारात सोय केली आहे.
पावसाळ्यात टेरेसवर पडणारे चार महिन्यांचे पाणी सोसायटीतील विहिरीत साठवून रेन वॉटर हार्वेस्टिंग करीत टॅकरमुक्त सोसायटी असा नावलौकिक प्राप्त झाला आहे. इमारतीच्या आवारातील बागेतील झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती वापरून पाण्याची नासाडी थांबवून बचत केली आहे. सुरक्षेची काळजी घेत सीसीटीव्ही कॅमेरे, दुचाकी, चारचाकी वाहनांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था अशा अनेक सुविधा आणि सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वीजबिलात कपात
सुमनशिल्प सोसायटीमध्ये चार विंग आहेत. ११२ सदनिका आहेत. यापूर्वी सोसायटीला येणारे एकत्रित बील ९० हजार रुपयांपर्यंत होते. नंतर यामध्ये कपात करीत ते बील चाळीस ते पंचेचाळीस हजारावर आणून ठेवले. असे असले तरी अशा मोठ्या रकमेची बीले सोसायटीतील सभासदांना कधीही न परवडणारे होते. त्यामुळे या बीलावर तोडगा काढण्यासाठी सौर ऊजेर्चा वापर करून वीज निर्मिती करण्याची संकल्पना पुढे आली. मात्र या यंत्रणेला लागणारा प्राथमिक खर्च बावीस लाख रुपए आहे. हा खर्च सोसायटीच्या आवाक्याबाहेरचा होता. पण ही किंमत बघूनही सभासद मागे फिरले नाहीत. त्यांनी सहभागातून या परिस्थितीवरसुध्दा मात करीत सबसिडी वगळता तब्बल साडेसोळा लाख रुपए गोळा केले. प्रत्येक सभासदांनी आपल्या सदनिकेचा देखभाल दुरूस्ती खर्च महिन्याला न भरता एकदाच वर्षाचा भरून तर कुणी मोठी रक्कम गुंतवणुक करून येणाºया व्याजामधून खर्च भरण्याची तजवीज केली. त्यामुळे हा सौर ऊर्जेवर चालणारा वीज निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे.