घोरावडेश्वर मार्ग झाला सुरक्षित
By admin | Published: February 23, 2017 02:56 AM2017-02-23T02:56:22+5:302017-02-23T02:56:22+5:30
भारतीय पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षाबाबत स्थानिक नागरिक नाराजी प्रकट करत असतानाच
देहूरोड : भारतीय पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षाबाबत स्थानिक नागरिक नाराजी प्रकट करत असतानाच डीओडी डेपोतील अधिकारी आणि कामगारांनी पुढाकार घेऊन देहूरोड, शेलारवाडीनजिकच्या श्री क्षेत्र घोरावडेश्वर डोंगरावरील मार्गाचे लोखंडी कठडे दुरुस्त केले. त्यामुळे येत्या शुक्रवारी (दि. २४) महाशिवरात्रीनिमित्त डोंगरावर येणाऱ्या भाविकांना होऊ शकणारा धोका टळला आहे.
श्री क्षेत्र घोरवडेश्वर डोंगरावरील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेसाठी दरीच्या बाजूने बनविलेले संरक्षण लोखंडी कठडे तुटले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्या संदर्भातील छयाचित्रासह सविस्तर वृत्त लोकमतने दि. ५ फेबु्रवारीच्या अंकात ‘पायऱ्यांचा भराव गेला वाहून, कठडे गायब’ यामथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. तेवाचून तळेगाव येथील डीओडी डेपोतील काही कामगार व अधिकारी यांनी सामाजिक जाणिवेच्या जाणिवेच्या भावनेतून संबंधित धोकादायक भागातील सर्व लोखंडी संरक्षक कठड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु केले. हे काम दोन दिवसात पूर्ण होणार असून यात्रेला येणाऱ्या भाविकांचा धोका टळला आहे. भारतीय पुरातत्व विभागाकडून गेल्या दोन वर्षात गैरसोयी दूर करण्याबाबत दुर्लक्ष होत असून या विभागाच्या दुर्लक्ष, निष्क्रियतेबाबत स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत .
डोंगरावर दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. सुमारे दोन लाखाहून अधिक भाविक शिवलिगच्या दर्शनासाठी येत असतात. मुख्य शिवलिंग तसेच विठ्ठल-रखुमाई व संत तुकाराम महाराज महाराजांच्या दर्शनासाठी बनविण्यात आलेल्या दर्शन रांगेलगत दरीच्या बाजूने बनविलेले लोखंडी कठडे विविध ठिकाणी तुटले होते. त्यामुळे गर्दीच्या वेळी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
दर्शनरांग तसेच डोंगर मार्गावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय होत होतरी. घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्यापासून जवळच असलेल्या तळेगाव येथील डिओडी डेपोतील पी. एन. करंडे यांच्यासह काही कामगारांनी पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करून संरक्षक लोखंडी कठडे दुरुस्तीबाबत सुचविले. त्यास संबंधित अधिकाऱ्यांनी संमती दिल्यांनतर त्यांच्या सहकार्याने कठडे दुरुस्ती करण्यात आले.
कठड्यांची रंगरंगोटी करण्यात आल्याने दर्शन रांग आकर्षक दिसू लागली आहे. संरक्षक कठडे दुरुस्ती झाल्याने नियमित दर्शनासाठी डोंगरवार जाणाऱ्या भिवाजी राक्षे, हरिद्वार भेगडे,बाळासाहेब शेलार यांच्यासह स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)