पिंपरीत बारावीच्या परीक्षेत मुलींचाच बोलबाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:48 PM2019-05-28T16:48:52+5:302019-05-28T17:27:35+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दुपारी एकला जाहीर झाला.
पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहर, मावळ, खेड व मुळशीतही मुलींनी बाजी मारली आहे. पिंपरी-चिंचवडचा निकाल ८९.०९ टक्के इतका लागला आहे. त्यात मुलींचे प्रमाण ९३.०१ टक्के, तर मुलांचे प्रमाण ८५.८४ टक्के इतका लागला आहे. गतवर्षी बारावीचा निकाल ९०.८७ टक्के लागला होता दीड टक्कयांनी निकाल घटला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दुपारी एकला जाहीर झाला. कला, वाणिज्य आणि विज्ञान आणि टेक्नॉलॉजी अशा शाखांसाठी शहरातील विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल असल्याने सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. बारा वाजल्यापासूनच मुले सायबर कॅफेमध्ये जागा धरून बसली होती. दुपारी एक वाजताच संकेतस्थळावर निकाल खुला केला.
शहर ग्रामीण भागातील ३० महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्यावर्षी ४७ महाविद्यालये शतकवीर ठरली होती. बारावीच्या परीक्षेला पिंपरी-चिंचवड शहरातील १७ हजार ४७४ विद्यार्थी बसले होते. त्यात मुले ९५४६ असून, मुलींची संख्या ७९२८ आहे. त्यांपैकी ७ हजार ३७४ मुले, तर ८१०४ मुली असे एकूण १५ हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची टक्केवारी ८५.९४ असून, मुलींची टक्केवारी ९३.०१ आहे. या व्यतिरिक्त पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल २०.४१ टक्के लागला असून गेल्यावर्षी हा निकाल ३८.३५ टक्के लागला होता. सुमारे अठरा टक्यांनी घट झाली आहे.
मावळचा निकाल ८४.९३ टक्के, तर मुळशीचा निकाल ८१.८३ टक्के, खेडचा निकाल ८४.९३ टक्के लागला आहे. मावळात मुलींचा निकाल ९१.९५, तर मुळशीत ८९.६७ टक्के, खेडमध्ये ९४.२२ टक्के लागला आहे.
३० महाविद्यालये शतकवीर
पिंपरी-चिंचवड, मावळ, मुळशी तालुक्यातील ३० कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक आहे. मराठी शाळांचा निकाल कमी लागला आहे. इंग्रजी शाळांतील टक्केवारी वाढतच आहे. त्यात तुलनेत मराठी शाळांची टक्केवारी कमी होत आहे. याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
...........
एकुण महाविद्यालये २२३
................
पिंपरी-चिंचवड-८२
हवेली -६२
मावळ-३३
मुळशी-१५
खेड-३१
..............
मुलींचे प्रमाण ९३.०१ टक्के,
मुलांचे प्रमाण ८५.८४ टक्के
.....