उद्योगनगरीत मुलींची बाजी
By admin | Published: May 31, 2017 02:32 AM2017-05-31T02:32:24+5:302017-05-31T02:32:24+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महाविद्यालयांतून बारावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण १६ हजार ४६३ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार १८९ विद्यार्थी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महाविद्यालयांतून बारावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण १६ हजार ४६३ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरातील बारावीचा निकाल ९२.२६ टक्के लागला आहे. निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.४४ असून, मुलांची टक्केवारी ८९.५९ इतकी आहे. १०० टक्के निकाल लागलेल्यांमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.
एचएससी बोर्ड पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्यांनी २०१७ च्या निकालात उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. ३१ महाविद्यालयांचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये १०० टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांमध्ये शिवभूमी विद्यालय, निर्मल बेथेनी, अमृता विद्यालय, डी़ वाय़ पाटील महाविद्यालय, सेंट उर्सुला, प्रियदर्शनी या महाविद्यालयांचा समावेश आहे. विज्ञान शाखेचा बहुतांशी विद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागलेली शहरातील २० महाविद्यालये आहेत.
‘नवमहाराष्ट्र’ची आघाडी
पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयातून किमान कौशल्यावर अधारित अभ्यासक्रम घेतलेले ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर न्यू इंग्लिश स्कूल, आबासाहेब चिंचवडे महाविद्यालयाचा या अभ्यासक्रमाचा निकाल ९१ टक्के लागला आहे. इंद्रायणी महाविद्यालयाचा निकालसुद्धा ९१ टक्के आहे. नोव्हेल इन्स्टिट्यूटचा ७८ टक्के निकाल लागल आहे.
फत्तेचंद जैन विद्यालयाचा निकाल ९६ टक्के आहे.
कला शाखेचा निकाल कमी
विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या तुलनेत कला शाखेचा निकाल कमी लागल्याचे दिसून येत आहे. सावित्रीबाई विद्या सेंटर, निगडी, प्रियदर्शनी विद्यालय,भोसरी ही विद्यालये कला शाखेच्या १०० टक्के निकालास अपवाद वगळता अन्य विद्यालयांमध्ये कला शाखेचा निकाल ९० टक्यापर्यंत लागला आहे. प्रियदर्शनी विद्यालयात एकाच विद्यार्थ्याने कला शाखेतून परीक्षा दिली होती. सवित्रीबाई विद्यालयातून १८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.