'तुमची मुलगी कॉलेजला कशी येते तेच पाहतो...'; मुलीच्या आई-वडिलांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 07:39 PM2022-10-17T19:39:41+5:302022-10-17T19:40:09+5:30
पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे....
पिंपरी : युवतीकडील मोबाईल हिसकावत त्याच्यावरून तिच्या मित्र -मैत्रिणींना फोन करून युवतीची बदनामी करण्यात आली. तसेच युवतीच्या आई-वडिलांना फोन करून तुमची मुलगी कॉलेजच्या गेटच्या आत कशी येते तेच बघतो, तिला मारून टाकतो, अशी धमकी दिली.
हा प्रकार २०२१ ते तीन ऑक्टोबर २०२२ या कालावधीत हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी युवतीने हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.१६) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम अकाऊंटवर फिर्यादीसोबत आरोपीची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले.
फिर्यादीने कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर आरोपीशी बोलणे बंद केले. त्याचा राग आल्याने आरोपीने तीन ऑक्टोबरला फिर्यादी म्हाळुंगे येथे थांबली असताना त्याने फिर्यादीला दिलेला मोबाईल घेतला आणि त्या फोनवरून फिर्यादीच्या आई- वडिलांना फोन करून धमकी दिली. तसेच फिर्यादीला वारंवार फोन करून तसेच पाठलाग करून त्रास दिला.