मुलींनी निर्भीडपणे पुढे यावे

By admin | Published: January 9, 2017 02:06 AM2017-01-09T02:06:46+5:302017-01-09T02:06:46+5:30

समाजात काही चुकीच्या गोष्टी अथवा गैरकृत्य होत असल्यास मुलींनी निर्भीडपणे पुढे यावे आणि आपल्या पालकांना व शिक्षकांना सांगावे

Girls should come forward boldly | मुलींनी निर्भीडपणे पुढे यावे

मुलींनी निर्भीडपणे पुढे यावे

Next

चाकण : समाजात काही चुकीच्या गोष्टी अथवा गैरकृत्य होत असल्यास मुलींनी निर्भीडपणे पुढे यावे आणि आपल्या पालकांना व शिक्षकांना सांगावे, असे आवाहन चाकण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी केले. कालच्या घटनेत मुलींनी न घाबरता शिक्षिकांना घडलेला प्रकार सांगितल्यामुळे एका आरोपीला पोलीस गजाआड करू शकले. त्या निर्भीड मुलींचे आम्ही कौतुक करतो, असे ते म्हणाले. ‘संवाद मनाशी, मनाचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मुलींनी व महिलांनी स्वसंरक्षणासाठी प्रतिसाद अ‍ॅप वापरावे. त्याची माहिती व निर्भया पथकाचे कार्य इंदुलकर यांनी उपस्थित विद्यार्थिनी, शिक्षिका व महिला पालकांना सांगितले. एखाद्या अडचणीच्या वेळी आपल्यावर एखादा प्रसंग ओढवल्यास अथवा अपघात किंवा एखाद्या घटनेची माहिती या अ‍ॅपद्वारे कळविल्यास पोलिसांची त्वरित मदत मिळते, असे त्यांनी सांगितले.
अश्लील व्हिडीओ प्रकरणाबाबत मुली बोलत्या झाल्या व त्याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना कथन केली.
एका मुलीने तर असे व्हिडीओ एक माणूस मुलींना दाखवीत असल्याचे घरी आईला सांगितले असता ‘असा काही प्रकार घडत नसतो,’ असे सांगून मुलीलाच दम दिल्याने मुलगी या कार्यक्रमात रडून सांगत होती. त्यामुळे तिने हा प्रकार कालच्या व्याख्यानातून जागृती झाल्याने शिक्षिकांना सांगितला.
मुख्याध्यापिका सुनंदा गारगोटे म्हणाल्या, की कालच्या व्याख्यानात मुलींनी मोकळेपणाने संवाद साधल्याने ही घटना उघडकीस आली.
हा इसम आपल्या घराच्या परिसरातही असे अश्लील व्हिडीओ दाखविण्याचे कृत्य करीत होता, तसेच इयत्ता दुसरी व तिसरीच्या मुलींपासून हे कृत्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी मुख्याध्यापिका सुनंदा गारगोटे, महिला दक्षता समितीच्या सदस्या मंगल देवकर, उपनिरीक्षक अर्चना दयाळ, निर्भया पथकातील महिला पोलीस पुष्पलता जाधव, हवालदार प्रवीण मुंडे, खेडकर, रोहिणी गव्हाणे, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
(वार्ताहर)

मुलींच्या नंतर महिला पालकांनाही पोलीस पथकाने मार्गदर्शन करून याबाबत जागृती केली. या वेळी महिला पालकांनी शाळेच्या गेटमधून मुलांना चॉकलेट दिले जातात, ते पालक असतात की कोण, हे कळतसुद्धा नाही, असे सांगून मुलींच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासनाने वॉचमन ठेवण्याची मागणी केली. तसेच बाहेरच्या शाळेतील मोठी मुले त्रास देत असल्यास तक्रारपेटीत चिठ्ठी लिहून टाकण्याचे आवाहन करून शिक्षकांना सांगावे, असे पोलीस उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांनी सांगितले.

Web Title: Girls should come forward boldly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.