फॅसिलिटी मॅनेजमेंटला द्या ‘इंडस्ट्रीज’चा दर्जा
By admin | Published: December 9, 2015 12:14 AM2015-12-09T00:14:05+5:302015-12-09T00:14:05+5:30
कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा पुरविणाऱ्या फॅसिलिटी मॅनेजमेंट या खासगी संस्थांना इंडस्ट्रीचा दर्जा दिला जावा.
पिंपरी : कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा पुरविणाऱ्या फॅसिलिटी मॅनेजमेंट या खासगी संस्थांना इंडस्ट्रीचा दर्जा दिला जावा. या संस्थांकडून लाखोंना रोजगार दिला जातो. मात्र, परदेशी कंपन्यांच्या स्वागतासाठी पायघड्या घालणारे सरकार त्यांना मात्र दुय्यम वागणूक देते, अशी खंत असोसिएशन आॅफ फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
साफसफाई, सुरक्षा, माळीकाम, वैद्यकीय सेवा आदींसह विविध ठिकाणी फॅसिलिटी मॅनेजमेंट संस्था काम करतात. या संस्थांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या राज्यस्तरावरील असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सोमवारी भेट दिली. पदाधिकाऱ्यांनी लोकमतच्या व्यासपीठावर आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या. या वेळी असोसिएशनचे सचिव विनायक घोरपडे, खजिनदार महेश खेडकर, कार्यकारिणी सदस्य अमोल भोईटे, राघवेंद्र खेडकर, अरुण थोरात, जी. एम. कनोजिया आदी उपस्थित होते.
कंत्राटी कामगारांना किमान वेतन ८ हजार रुपये आहे. ते वाढवून १५ हजार करावे. कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे कंपन्या गांभीर्याने लक्ष देत नाहीत. संस्थांच्या माध्यमातून दर्जात्मक काम केले जाते. या संस्थांना इंडस्ट्रीचा दर्जा द्यावा. त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल.
- विनायक घोरपडे
फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या माध्यमातून सेवा पुरविणाऱ्या सर्व संस्थांना आयएसओ ९००० प्रमाणपत्र आहे. सर्व प्रकारचे कर वेळेत आणि नियमित भरले जातात. कामगारांचे वेतन आॅनलाइन होते. भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही. कामगारांना अनेक सुविधा आणि सेवा, वेळप्रसंगी कर्ज पुरविले जाते.
- महेश खेडकर