एमसीए सीईटी न दिलेल्यांना संधी द्या
By admin | Published: May 30, 2017 02:24 AM2017-05-30T02:24:36+5:302017-05-30T02:24:36+5:30
एमसीएसाठी सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटून केली आहे. निगडी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : एमसीएसाठी सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटून केली आहे.
निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शिक्षणमंत्री तावडे रविवारी निगडीत आले होते. पालकांच्या वतीने सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी खासदार गजानन बाबर, शिवसेनेचे माजी सपंर्कप्रमुख नंदकुमार सातुर्डेकर यांनी निवेदन दिले. सध्याचे युग हे संगणकाचे युग असल्याने बीसीए, एमसीए,आदी कोर्सेसकडे विद्यार्थी व पालकांचा ओढा आहे. मात्र, बीसीए झाल्यानंतर एमसीएला प्रवेशासाठी मागील वर्षांपासून सीईटी परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. वास्तविक बीसीए परीक्षेनंतर नोकरी शोधावी, की एमसीए ला प्रवेश घ्यायचा याबाबत विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात. त्यांना संबंधित मॅनेजमेंट कॉलेजमध्ये याबाबत योग्य ते मार्गदर्शनही मिळत नाही. एमसीएला प्रवेश घ्यावा असे त्यांना वाटते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यांचे वर्ष वाया जाते. एकतर प्लेसमेंट शोधणे अथवा वर्षभरासाठीचा एखादा कोर्स करणे एवढाच मार्ग त्यांच्यासमोर शिल्लक राहतो. त्यामुळे सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
मागील वर्षीही सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पुणे विद्यापीठाने ती अमान्य केली. या वर्षीही एमसीए अभ्यासक्रमास प्रवेशासाठी अठरा मार्चला सीईटी परीक्षा घेण्यात आली़ मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही. अशा विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.