'५१ लाख दे नाहीतर तुझे फोटो गुगलवर टाकून बदनाम करू', ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
By नारायण बडगुजर | Published: May 22, 2024 07:47 PM2024-05-22T19:47:47+5:302024-05-22T19:48:07+5:30
व्हॉटसअप डिपीचा फोटो माॅर्फ करून सुरुवातीला २ हजार घेतले, त्यानंतर ५१ लाखांच्या खंडणीची मागणी केली
पिंपरी : व्हॉटसअप डिपीचा फोटो माॅर्फ केला. पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. या ब्लॅकमेलींगला कंटाळून तरुणाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. डूडुळगाव येथे १५ मे २०२४ रोजी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
किरण नामदेव दातीर (३५, रा. डूडुळगाव, मूळगाव अहमदनगर), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. सौरभ शरद विरकर (२६, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. २१) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सूरज कुमार व इतर संशयित अज्ञात मोबाईल धारकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ यांचा मावसभाऊ किरण याच्या व्हाट्सॲप डीपीच्या फोटो घेऊन त्या फोटोशी छेडछाड करत किरण याला व्हाट्सअप वर पाठवला. तसेच त्याला ब्लॅकमेल करत सुरुवातीला दोन हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा बँक खात्यावर दहा हजार रुपये घेतले. त्यानंतरही संशयितांनी वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून फोन करून किरण यांना आणखी पैशांची मागणी केली. ‘‘५१ लाख रुपये दे नाहीतर तुझे हे फोटो गुगलवर टाकू व तुला बदनाम करू’’, अशी धमकी देत संशयितांनी खंडणी मागितली. याला कंटाळून किरण यांनी राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.
किरण हे एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. पत्नी आणि मुलासह ते डूडुळगाव येथे वास्तव्यास होते. पत्नी आणि मुलगा हे गावी गेले होते. त्यावेळी किरण यांनी गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून किरण यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. किरण यांच्या घरात पोलिसांना सुसाइड नोट मिळाली आहे. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असून, संशयितांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ तपास करीत आहेत.