‘पिफ’च्या मुख्य व्यासपीठाला ‘पुलं’चे नाव देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 02:17 AM2019-01-06T02:17:26+5:302019-01-06T02:18:18+5:30
ज्येष्ठ संगीतकार नौशाद, स्नेहल भाटकर आणि ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांच्या आठवणींनाही या ठिकाणी उजाळा देण्यात येणार आहे.
पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात ‘गीतरामायण’ची ज्योत चेतवणारे ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर आणि त्याला स्वरसाज चढवीत सांगीतिक विश्वात हे महाकाव्य अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे आंतरराट्रीय चित्रपट महोत्सवच्या (पिफ) फोरमला ‘पु. ल देशपांडे’ यांचे तर फोरमच्या बाहेरील प्रवेशद्वारास गदिमा आणि सुधीर फडके यांची नावे देण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ संगीतकार नौशाद, स्नेहल भाटकर आणि ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांच्या आठवणींनाही या ठिकाणी उजाळा देण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, फाउंडेशनच्या विश्वस्त सबिना संघवी, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अभिजित रणदिवे आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य शासन यांच्या वतीने येत्या १0 ते १७ जानेवारीदरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार आहे. चिली देशातील गोंजालो जस्टिनिअँनो यांनी दिग्दर्शित केलेला ‘डॅम किड्स’ हा स्पॅनिश चित्रपट या वर्षीच्या पिफची ‘ओपनिंग फिल्म’ असणार आहे. याशिवाय मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात सात चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मुळशी पॅटर्न, नाळ, खटला बिताला, भोंगा, चुंबक, बोधी, दिठी यांचा समावेश आहे. या वर्षी ‘रेस्ट्रोपेक्टिव्ह’मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मेहबूब खान यांचे ‘अमर’, ‘अंदाज’ आणि मदर इंडिया, तर इटालियन दिग्दर्शक बर्नार्डो बर्टोलुस्सी यांचे ‘द लास्ट एम्परर’, ‘लिटील बुद्धा’ आणि ‘लास्ट टँंगो इन पॅरिस’हे चित्रपट दाखविले जातील.
याशिवाय काही मान्यवर कलाकारांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ‘ट्रिब्युट’ विभागांतर्गत अभिनेत्री श्रीदेवी यांचा ‘इंग्लिश विंग्लिश’, दिग्दर्शिका कल्पना लाझमी यांचा ‘रुदाली’ आणि पटकथाकार शिनोबु हशीमोटो यांचा ‘टू लिव्ह’ हे चित्रपट दाखविण्यात येतील, तर ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचा ‘भुवन शोम’द्वारे त्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे.
’पिफ फोरम’मधील आयोजित कार्यक्रम
च्विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानांतर्गत प्रसिद्ध पटकथा लेखक कमलेश पांडे यांचे व्याख्यान
च्प्रसिद्ध कलाकार रोहिणी हट्टंगडी यांचे व्याख्यान, विषय ‘माझा प्रवास - अभिनेत्रीचे मनोगत’
च्श्याम बेनेगल यांचे ‘द कंटिन्यूड रिलेव्हन्स आॅफ गांधी’ या विषयावर व्याख्यान
च्‘अंधाधुन’ चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्याशी संवाद
च्‘सिंगिंग स्ट्रिंग्ज’ या कार्यक्रमांतर्गत मानस गोसावी यांचे मोहनवीणावादन
च्‘२०१८ सालातील मराठी चित्रपटांचे यश’ या विषयावर परिसंवाद, सहभाग- प्रवीण तरडे, भाऊराव कºहाडे, दिग्पाल लांजेकर, संदीप जाधव, राजेंद्र शिंदे, सौमित्र पोटे, मेघराज राजेभोसले आणि विनोद सातव
च्‘३६० सिनेमा अॅण्ड ट्रान्समीडिया’ या विषयावर व्याख्यान, सहभाग चित्रपटनिर्माते बायजू कुरूप, विवेक सुवर्णा आणि प्रसिद्ध छायाचित्रकार नीरज गेरा
च्इटलीच्या प्रसिद्ध वेशभूषाकार डॅनिएला सिअॅन्सिओ यांचे व्याख्यान
च्‘डॉन स्टुडिओ’चे सादरीकरण
च्‘तपस’ या बॅण्डचे सादरीकरण