ट्रकसह चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या; सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 02:53 PM2021-06-12T14:53:27+5:302021-06-12T14:55:29+5:30
भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्रीनगर चाैकात ही घटना घडली
पिंपरी : विनाकारण ट्रकसह चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्रीनगर चाैकात ही घटना घडली.
वैजनाथ सदाशिव आडागळे (वय ५२, रा. पिंपळे गुरव, मूळ रा. करकंब भोसे, ता. पंढरपूर) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. ११) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरमान देशमुख, सनी चिवे (दोघेही रा. कासारवाडी) व इतर चार अनोळखी तरुण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची ट्रक विसावा हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. आरोपींनी विनाकारण बांबूने ट्रकची शो काच फोडली. तसेच वरूण हॉटेलच्या दिशेने जाताना रस्त्याच्या कडेला शास्त्रीनगर चौकात सुखवाणी पॅरेडाईजच्या समोर राजेश वाटकर यांच्या पार्क केलेल्या चारचाकी वाहनाच्या मागच्या बाजूची काच फोडली. आरोपींनी दोन्ही वाहनांचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक फौजदार के. के. बुढे तपास करीत आहेत.