कामावरून सावकाश अन् सुरक्षित जा घरी; अति घाईने उगाचच जीव जाईल रस्त्यावरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 05:17 PM2022-08-27T17:17:44+5:302022-08-27T17:20:01+5:30
सायंकाळी वाहन चालविताना चालकांनी खबरदारी घ्यावी...
-नारायण बडगुजर
पिंपरी : कामावरून सुट्टी झाल्यानंतर सायंकाळी घरी जाण्यासाठी प्रत्येकजण घाई करतात. मात्र, हीच घाई जीवावर बेतत असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत ४७४ रस्ते अपघात झाले. त्यातील सर्वाधिक १६० अपघात सायंकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत झाले. यात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत ४१ जणांनी जीव गमावला. त्यामुळे सायंकाळी वाहन चालविताना चालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध संस्था, प्रशासन यांच्या सहकार्याने विविध उपाययोजना करण्यावर पोलिसांचा भर आहे. त्यासाठी अपघातांची कारणे, ठिकाणे आणि वेळ याबाबत सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री कोणत्या वेळेत किती अपघात होतात याची नोंद करून त्यानुसार अपघात टाळण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत.
मध्यरात्री अपघात कमी
रात्री बारा ते पहाटे तीन या वेळेत रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होते. परिणामी अपघात कमी होतात. यावेळेत सात महिन्यांत एकूण ४१ अपघात झाले. त्यात प्राणांतिक नऊ अपघात झाल्याची नोंद आहे. पहाटे तीन ते सकाळी सहा या वेळेत एकूण ३७ अपघात झाले. त्यात प्राणांतिक १७ अपघातांची नोंद आहे.
‘त्या’ अपघातांमध्ये ४१ जणांनी गमावला जीव
सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत झालेल्या ८० अपघातांमध्ये ४१ जणांना जीव गमवावा लागला. तर ४१ जण गंभीर जखमी झाले. तसेच सात जणांना किरकोळ दुखापत झाली. रात्री नऊ ते बारा या वेळेत झालेल्या ८० अपघातांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. तर ६० जण गंभीर जखमी झाले. तसेच ११ जणांना किरकोळ दुखापत झाली.
एका डुलकीमुळे होतो घात...
पहाटेच्या वेळेत झोप अनावर होते. असे असतानाही चालक वाहने दामटतात. यातून त्यांना डुलकी लागून अपघात होतात. यात जीवित हानी देखील होते. महामार्गांवर लांब पल्ल्यांच्या वाहनांना अशा प्रकारे अपघात होण्याचे प्रकार जास्त आहेत. तसेच सायंकाळी काम संपवून घरी जाण्याची घाई असलेल्या वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. यात वाहतूक कोंडी होणे, वाहतुकीचा वेग मंदावणे असे प्रकार होतात. तसेच अपघातही होतात.
कामावरून घरी जाण्याची घाई करताना अनेकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. सायंकाळी सहा नंतर रस्त्यावर मोठी वर्दळ असते. असे असतानाही काही दुचाकीस्वार चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करतात. त्यामुळे अपघात होतात. वाहनचालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे.
- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी वाहतूक विभाग
जानेवारी ते जुलै २०२२ दरम्यान झालेले अपघात
वेळ - अपघात - मृत संख्या - गंभीर जखमी संख्या - किरकोळ दुखापत
सकाळी सहा ते नऊ - ५५ - १३ - ३६ - ९
सकाळी नऊ ते दुपारी १२ - ५५ - २२ - ३० - १०
दुपारी बारा ते तीन - ५६ - २१ - ३१ - ६
दुपारी तीन ते सायंकाळी सहा - ६८ - २६ - ४९ - १२
सायंकाळी सहा ते रात्री नऊ - ८० - ४१ - ४१ - ७
रात्री नऊ ते १२ - ८० - २७ - ६० - ११
रात्री १२ ते पहाटे तीन - ४१ - ९ - २७ - ६
पहाटे तीन ते सकाळी सकाळी सहा - ३७ - १७ - २० - ८