देवा... सात जन्मी हीच बायको मिळू दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 09:27 PM2018-06-26T21:27:46+5:302018-06-26T21:58:38+5:30
वटपौर्णिमेच्या सणाला महिला मंडळी आपल्याला हाच पती सात जन्म मिळण्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात. पण....
हणमंत पाटील
पिंपरी : आधुनिक काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला विविध क्षेत्रांत काम करीत आहेत. तरीही परंपरेनुसार वटपौर्णिमेच्या सणाला महिला मंडळी आपल्याला हाच पती सात जन्म मिळण्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात, तर पुरुषांनीसुद्धा हीच पत्नी सात जन्म मिळावी यासाठी पूजा करण्यास हरकत नाही, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरातील मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेतर्फे पिंपळे गुरव येथे पुरुष मंडळींकडून उद्या (बुधवारी) सकाळी वटवृक्षाची पूजा करण्यात येणार आहे.
भारतीय संस्कृतीत हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानुसार वटपौर्णिमेच्या सणादिवशी महिला सकाळपासून वटवृक्षाच्या पूजेची तयारी करतात. दीर्घायुष्य देणाऱ्या वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालून सूत गुंडाळतात. या वेळी सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. घरी पुरणपोळी व गोड पदार्थ केले जातात. पत्नी-पतीचा आदर व पूजा करते. आता काळ बदलला आहे. पुरुषांप्रमाणे महिलाही विविध क्षेत्रांत आघाडीवर आहेत. त्यामुळे समाजात स्त्री-पुरुष समानता निर्माण व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवड येथील मानवी हक्क संघटनेने पुढाकार घेत ह्यही पत्नी सात जन्म मिळू दे, अशी प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी दिली.
सामाजिक बांधिलकीतून संघटनेच्या वतीने पिंपळे गुरव येथील जिजाऊ उद्यानाजवळील कांकरिया गोडाऊन येथे बुधवारी (दि. २७) सकाळी १० ला पुरुष मंडळींकडून वटपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्लॅस्टिक न वापरण्याची व पर्यावरण जनजागृतीची शपथ नागरिकांना देण्यात येणार आहे. या प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, संगीता जोगदंड, अॅड. सचिन काळे, एस. डी. विभुते, दीपक शहाणे, गजानन धाराशिवकर, अरुण पवार, अरविंद मांगले, वसंत चकटे, मुरलीधर दळवी, हनुमंत पंडित, दत्तात्रय घोरपडे, अदिती निकम, शांताराम पाटील आदी पुरुष मंडळी व महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत.