शासकीय नोकरी, बंगला - गाडी अन् हवं रग्गड पॅकेज; मुलींच्या अपेक्षांसमोर मुले हतबल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 10:21 AM2022-11-14T10:21:21+5:302022-11-14T10:21:55+5:30
शहरात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक असूनही अपेक्षांच्या ओझ्यामुळे वर पित्यांची धावपळ
पिंपरी : तुळशीच्या लग्नापासूनलग्न सोहळ्यांचे आयोजन करण्यासंदर्भात नियोजन केले जाते. वधू-वर शोधमोहीम सुरू होईल. अलीकडे मुलींच्या अपेक्षा वाढल्याने अनेक मुलांचे लग्नाचे वय संपत चालले आहे. त्यामुळे पुण्यात नोकरी हवी, व्यवसाय हवा. त्यासोबतच गावाकडे शेतीवाडी आणि बंगलाही हवा, अशी अपेक्षा वधूमंडळींची वाढली आहे.
विकास होत असताना आता नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. त्यात विवाह होणे आणि मोडण्याचे प्रमाण वाढत आहे. वधू आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अपेक्षा यामुळे मुलींचे विवाह रखडत आहेत. शहरात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक आहे. अपेक्षांच्या ओझ्यामुळे वर पित्यांची धावपळ होत आहे.
मुलींसाठी या पाच गोष्टी महत्त्वाच्या
१) हवी बंगला, गाडी : पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चशिक्षित मुलींना तसेच त्यांच्या पालकांना मुलाला शासकीय नोकरी, रग्गड पॅकेज, स्वतंत्र बंगला, फ्लॅट हवा आहे. त्यासोबतच घरी चारचाकीही हवी आहे.
२) पुण्यात नोकरी : ग्रामीण भागात तसेच शहरी भागातील मुलींना आता शहरात नोकरी हवी. तसेच चांगले पॅकेज हवे, आयटी, डॉक्टर अशा वरांना प्राधान्य दिले जात आहे.
३) शेती हवी : शहरात चांगल्या प्रकारची नोकरी असली तरी ग्रामीण भागात सातबारा आहे की नाही, हेही मुलीचे पालक पाहत आहेत. नोकरीबरोबर पालक मुलाची शेती किती आहे हे प्रामुख्याने पाहिले जात आहे.
४) एकत्रित कुटुुंब नको : मुलींना स्वातंत्र्य हवे आहे. एकत्रित कुटुंब पद्धत नको आहे. मी आणि माझा संसार याला प्राधान्य.
५) मुलींच्या पालकांऐवजी मुलीच वर निवडण्यावर प्राधान्य देतात. रंग, नोकरी, पॅकेज याला प्राधान्य दिले जात आहे.
सर्वच समाजात मुली मिळणे अवघड
मुलींचा जन्मदर हा मुलांपेक्षा कमी आहे. त्यामुळे सगळ्याच समाजात मुलींचे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत मुलांचे शिक्षण कमी असल्याने मुली मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सर्वांनाच मुलींसाठी शोध घ्यावा लागत आहे.
शेतकरी मुलाची अवस्था अधिक वाईट
शेतकरी मुलांना शिक्षित नसेल आणि शेती नसेल तर मुलगी मिळणे अवघड आहे. मुलगी मिळाली तरी शेतीत काम करण्यास उत्सुक नसते. त्यामुळे शेतकरी मुलांची अवस्था वाईट आहे. त्यांचे लग्नाचे प्रमाण ३५ वर्षांपर्यंत गेल्याचे दिसून येत आहे.