सरकारची धोरणे उद्योगांसाठी! राज्यात हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी आणणार-उदय सामंत
By विश्वास मोरे | Published: November 7, 2022 06:22 PM2022-11-07T18:22:50+5:302022-11-07T18:22:56+5:30
उद्योग आणि उद्योजकांचे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविले जातील
पिंपरी : उद्योगांना पूरक असे धोरण राज्य सरकारचे आहे. राज्यात लवकरच हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी तयार केली जाणार आहे. याबाबत येत्या दोन ते तीन महिन्यात सकारात्मक परिणाम दिसतील. उद्योग आणि उद्योजकांचे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन अशी माहिती उद्योगमंत्रीउदय सामंत यांनी चिंचवड येथे सोमवारी दिले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चर (एमसीसीआयए) च्या पुणे मॅन्युफॅक्चरिंग अँड डिफ्टेक एक्स्पोचे आयोजन केले आहे. त्यात उद्योगमंत्री सामंत सहभागी झाले होते.
सामंत म्हणाले, ‘‘पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. आता ऑटो, उद्योगांचीही पंढरी होत आहे. उद्योगाच्या कोणत्याही क्षेत्रातील शाश्वत वाढीसाठी सरकार आणि उद्योग यांच्यात निरोगी संवाद आवश्यक आहे. सरकारची धोरणे ही उद्योगांसाठी आहे. राज्यातील हायड्रोजन पॉलिसी, आयटी पॉलिसी आणि वाईन पॉलिसी यासारख्या प्रलंबित धोरणे येत्या तीन ते चार महिन्यांत तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल.’’
उद्योगांना पूरक असे धोरण राबविणार
सामंत म्हणाले, ‘‘एमआयडीसीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी एमआयडीसींना भेट देत आहेत. उद्योगवाढीसाठी आवश्यक असणारी धोरणे, जाचक नियम बदलण्याचा प्रयत्न आणि अधिकाधिक गुंतवणूक, रोजगार उपलब्ध होतील, असे धोरण राबविणार आहे. नर्सरी व्यवसाय आणि फ्लोरीक्लर वाढीसाठी जाचक असणारे नियम शिथील केले जाणार आहेत. ’’