प्रशासनाने झुगारला राजकीय दबाव
By admin | Published: April 15, 2017 03:58 AM2017-04-15T03:58:30+5:302017-04-15T03:58:30+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करणारे आणि पदाधिका-यांशी जवळीक असलेल्या काही पीसीएमटीच्या कर्मचाऱ्यांना पीएमपीत वर्ग करू नये, म्हणून भाजपाच्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करणारे आणि पदाधिका-यांशी जवळीक असलेल्या काही पीसीएमटीच्या कर्मचाऱ्यांना पीएमपीत वर्ग करू नये, म्हणून भाजपाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिका आणि पीएमपी प्रशासनावर दबाव टाकला. मात्र, पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना हा दबाव झुगारला. त्यामुळे महापालिकेतील वशिलेबाज कर्मचा-यांना नोकरी टिकविण्यासाठी अखेरीस पीएमपीमध्ये रुजू व्हावे लागले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करणारे पीसीएमटीचे १७८ कर्मचारी पीएमपीमध्ये पुन्हा रुजू करण्यात यावे, असे पत्र तुकाराम मुंढे यांनी दिले होते. त्यावर महापालिकेतील कर्मचारी पुन्हा पीएमपीकडे वर्ग करण्यास शहरातील पदाधिकाऱ्यांनी विरोध करीत राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी पीसीएमटीकडील अतिरिक्त ठरणारे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पीसीएमटीकडून वर्ग केले होते. या कर्मचाऱ्यांची पीएमपीला नितांत
गरज असल्याने त्यांना वर्ग करण्यात यावे, अशी अनेक दिवसांची मागणी होती. मात्र, त्यावर कार्यवाही करण्यात येत नव्हती.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी पिंपरी महापालिकेला त्याविषयी थेट पत्र दिले. तसेच दोन दिवसांत कर्मचाऱ्यांनी पीएमपीमध्ये रुजू व्हावे, असेही त्यांनी नमूद केले होते. (प्रतिनिधी)
संभ्रम : भाजपाच्या एका गटाचा विरोध
महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परत पीएमपीएमएलकडे देण्यास महापौर नितीन काळजे यांनी विरोध दर्शविला होता. आयुक्तांशीही चर्चा केली होती. मात्र, आयुक्तांनी रुजू होण्याचे आदेश दिल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या कामगारांना ठेवायचे की पुन्हा पीएमपीत पाठवायचे याबाबत भाजपात दोन गट झाले होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही तुकाराम मुंढे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र, महापालिका आयुक्त किंवा मुंढे राजकीय दबावापुढे झुकले नाहीत.
निलंबनाच्या भीतीने कामावर रुजू
पीएमपीएमएलमध्ये रुजू न झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचा इशारा मुंढे यांनी दिला होता. गुरुवारी सकाळपर्यंत कामगारांनी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न अयशस्वी ठरल्याने महापालिका प्रशासनाने हात वर केल्याने अखेरीस निलंबनाची कारवाई होऊन नोकरी जाऊ शकते या भीतीने महापालिकेतील कर्मचारी पीएमपीएमएलमध्ये रुजू झाले आहेत.