शाहीर घडण्यासाठी शासनाने शिक्षणसंस्था स्थापन कराव्यात - श्रीपाल सबनीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:26 AM2019-02-09T01:26:33+5:302019-02-09T01:27:11+5:30
महाराष्ट्राच्या संस्कृती संवर्धनात लोककलांचे आणि शाहिरी कलेचे मोठे योगदान आहे. शाहीर जगला, तर महाराष्ट्र जगेल. राज्य शासनाने शाहिरीच्या शिक्षणासाठी हात देण्याची गरज आहे.
पिंपरी - महाराष्ट्राच्या संस्कृती संवर्धनात लोककलांचे आणि शाहिरी कलेचे मोठे योगदान आहे. शाहीर जगला, तर महाराष्ट्र जगेल. राज्य शासनाने शाहिरीच्या शिक्षणासाठी हात देण्याची गरज आहे. शासनाने शाहीर निर्माण होण्यासाठी शिक्षणसंस्था स्थापन कराव्यात, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून तीनदिवसीय भव्य शाहिरी महोत्सव सुरू आहे. मनोहर वाढोकार सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी-प्राधिकरणातील कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी एनएसजी कमांडो आॅफिसर जगदीश देसले, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, कार्याध्यक्ष प्रकाश ढवळे, स्वागताध्यक्ष भीमा बोबडे उपस्थित होते. या वेळी पोवाडा - राष्ट्र चैतन्यगीत या विषयावर डॉ. गंगाधर रासगे यांना पीएचडी पदवी संपादित केल्याबद्दल सन्मानित केले.
शाहीर दादा पासलकर म्हणाले, ‘‘शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी दृढ व्हावी.’’ डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘शाहिरी स्फूर्तिगान, कीर्तिगान, गौरवगान आहे. शाहिरी परंपरेत सर्व जाती-धर्मांचे शाहीर आढळतात. विद्वान हे बेईमान असतात; पण शाहीर एकनिष्ठ आहेत. विद्वान हा संस्कृतीची वजाबाकी करतो; तर शाहीर तिची बेरीज करतो. आजकाल महापुरुषांची जातिनिहाय वाटणी केली जाते; परंतु शाहीर सर्व जातींना एकत्र जोडतो आणि सर्व महापुरुषांना वंदन करतो. अनेक प्रकारच्या अवहेलना, उपेक्षा सहन करीत शाहीर आणि लोककलावंत समाजासाठी जगले म्हणून शाहीर आणि लोककलावंत हे महाराष्ट्राचे खरेखुरे संचित आहे. शाहिरांनी कधीही जातीय विष समाजात पेरले नाही, याचा बोध इतिहासकारांनी घ्यायला हवा.’’
या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी उद्घाटन केले. भोईर म्हणाले, ‘‘लोककला हे चालते बोलते विद्यापीठ असल्याने दीडशे वर्षे राज्य करूनही ब्रिटिश आपली संस्कृती नष्ट करू शकले नाहीत.’’
बक्षीस वितरणास पत्रकार अविनाश चिलेकर, शिक्षण समिती उपसभापती शर्मिला बाबर, शिवसेना पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, युवा बांधकाम उद्योजक विजय रामाणी, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, कार्याध्यक्ष प्रकाश ढवळे, विदर्भ प्रमुख बहाद्दुला बराडे, सांगली शाखाध्यक्ष अनंतकुमार साळुंखे आदी उपस्थित होते.
या वेळी महोत्सवानिमित्त इतिहासकालीन दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रकाश ढवळे यांनी प्रास्ताविक केले. शीतल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले.
बालशाहीर पोवाडा स्पर्धेत प्रथमेश थोरात प्रथम
माझी मैना गावावर राहिली माज्या जिवाची होतिया काहिली... ही शाहीर अण्णा भाऊ साठेरचित छक्कड आणि शिवाजीमहाराजांच्या पोवाड्याचे अतिशय जोशपूर्ण सादरीकरण करीत पाचवर्षीय बालशाहीर अमोघराज आंबी याने रसिकांचे मन जिंकले. भव्य राज्यस्तरीय बालशाहीर पोवाडा स्पर्धा झाली. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवांतर्गत बालशाहीर स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात लेखिका वंदना मांढरे अध्यक्षस्थानी होत्या. भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद्र बाबर, युवा उद्योजक हेमंत देवकुळे, माजी नगरसेवक वसंत शेवडे, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश ढवळे, कोल्हापूर शाखाध्यक्ष श्यामराव खडके उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या विविध भागांतून आलेल्या सुमारे २६ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. शाहीर बजरंग आंबी (सांगली) आणि शाहीर शिवाजीराव पाटील (जळगाव) यांनी परीक्षण केले. प्रथमेश थोरात (प्रथम), ओम तळपे (द्वितीय), चैतन्य काजोळकर (तृतीय) यांनी बक्षीस मिळविले.