ग्रेड सेपरेटरमधील लेन सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:53 AM2018-11-11T01:53:13+5:302018-11-11T01:53:34+5:30
खराळवाडी ते वल्लभनगर : सेगमेंटचे काम पूर्ण झाल्याने महामेट्रोचा निर्णय
पिंपरी : स्वारगेट-पिंपरी या पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम शहरात सुरू आहे. दापोडी ते पिंपरी ग्रेड सेपरेटरमधील एक्स्प्रेस लेनवरील खराळवाडी ते वल्लभनगर येथील मेट्रोचे सेगमेंटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूने बंद असलेली एक लेन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी टळणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात महामेट्रोच्या वतीने काम वेगाने सुरू आहे. दापोडीच्या हॅरिस पूल ते मोरवाडीतील मदर तेरेसा उड्डाण पूल या मार्गावर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. खराळवाडीतून कामास सुरुवात झाली होती. वर्षापासून हे काम सुरू होते. खराळवाडी, एचए कंपनी, हाफकिन इन्स्टिट्यूट मार्गासह वल्लभनगर एसटी आगारापर्यंत सेगमेंटचे काम पूर्णत्वास येत आहे. सुमारे दीड किलोमीटर काम आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरच्या एक्स्प्रेस मार्गावरील दोन्ही बाजूने बंद केलेली प्रत्येकी एक लेन वाहतुकीस खुली केली जाणार आहे. त्यासाठी सर्व खांबावर दक्षतेच्या सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत. काँक्रिटीकरणाचेही काम सुरू आहे.
मेट्रो स्टेशनचे काम सुरू
वल्लभनगर एसटी आगारासमोर संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. स्टेशनचे खांब वगळून गर्डर लाँचर पुढील खांबांवर बसविला जाणार आहे. त्यासाठी प्रथम दोन खांबांवर क्रेनने सेगमेंटची जुळवणी केली जाणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी गर्डर लाँचर बसविला जाणार आहे. या लाँचरद्वारे नाशिक फाटा चौकापर्यंत सेगमेंटची जुळवणीचे काम केले जाणार आहे. शंकरवाडीतील पेट्रोल पंपाच्या येथून मेट्रो मार्गिका वळण घेऊन भारतरत्न जे. आर. डी़ टाटा उड्डाणपुलाच्या दिशेने जाणार आहे.