ग्रामपंचायत निवडणूक : नऊ गावांत मतदारांचा उत्साह; शांततेत झाले ८४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:48 AM2017-10-17T02:48:33+5:302017-10-17T02:48:42+5:30
मावळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या २३ प्रभागात २५ मतदान केंद्रावर सोमवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० दरम्यान ८४.२७ टक्के मतदान झाले.
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या २३ प्रभागात २५ मतदान केंद्रावर सोमवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० दरम्यान ८४.२७ टक्के मतदान झाले.
तालुक्यातील इंदोरी, निगडे, गोडूंब्रे, शिरगाव, देवले ,वरसोली ,भोयरे ,सावळा व कुणेनामा या ९ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या ८१ जागापैकी ३६ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरीत ३९ जागांसाठी ९८ उमेदवार तर ८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते
मतदान प्रक्रियेसाठी १२५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते .तर २५ अधिकारी व कर्मचारी राखीव ठेवले होते, अशी माहिती तहसीलदार रणजित देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी दिली.
एक मतदान केंद्राध्यक्ष, २ मतदान अधिकारी १ मतदान कर्मचारी १ पोलीस कर्मचारी असे एका मतदान केंद्रावर ५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यावेळी मतदान केंद्राच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्राच्या परिसरात व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे इंदोरीचा सरपंच पदासह सदस्यांच्या १७ जागांपैकी सोळा जागा बिनविरोध झाले आहेत येथे फक्त एक जागेसाठी निवडणूक झाली.
वरसोली, कुणेनामा, देवलेमध्ये सकाळी संथगती
लोणावळा : शहरालगत असलेल्या वरसोली व कुणेनामा, तसेच मळवलीजवळील देवले या तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी शांततेत मतदान झाले.
मावळात प्रथमच जनतेमधून सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. सकाळी साडेसातला तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात सर्वत्र मतदानाचा वेग चांगला होता. दुपारपर्यंत बहुतांश मतदान झाले होते. कुणेनामामध्ये ११५९ पैकी ८८७, देवलेमध्ये ११६६ पैकी ९९७, तर वरसोलीमध्ये १०८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
कुणेनामा येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी, वरसोलीचे सरपंचपद सर्वसाधारण महिला व देवलेचे सरपंचपद हे सर्वसाधारणसाठी राखीव होते. सर्वच ठिकाणी मोठी चुरस पाहायला मिळाली.
उमेदवारांची धावपळ
टाकवे बुदु्रक : आंदर मावळातील भोयरे, सावळा, निगडे या गावातील ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक प्रथमच जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने उमेदवारांची चांगलीच धावपळ दिसून येत होती. दिवसभर कार्यकर्त्यांनी वॉर्डनिहाय मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रावर
आणले.
जनतेतूनच सरपंच निवड होणार असल्याने नागरिकांत वेगळीच उत्सुकता दिसत होती. मतदारांवरही कोणता दबाव असल्याचा प्रकार दिसला नाही. मतदारांनी उत्साहात मतदान केले.
विजय मिळविण्यासाठी सर्व उमेदवार आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. मात्र, काही ठिकाणी साम, दाम, दंड,भेदचा वापर केल्याचे बोलले जात होते. गावकी, भावकीच्या निर्णायक मतांवर विजयाची गणिते मांडली जात आहेत.
परगावी असलेल्या मतदारांना विशेष वाहन उपलब्ध करून मतदानासाठी केंद्रावर आणण्यात लगबग दिसत होती. वेगवेगळ्या युक्त्या करीत आमिषेही मतदारांना दाखविण्यात आली होती.
गावातील ज्येष्ठ नागरिक शांतता राखण्याचे आवाहन वेळोवेळी करीत होते. मतदान केंद्रावर वडगाव पोलिसांचा बंदोबस्त होता. कोणताही अनुचित प्रकार न होता निवडणूक सुरळीत पार पडली. प्रचार करण्यासाठी आणि मतदान करून घेण्यासाठी अथक परिश्रम
करणारे कार्यकर्ते आता आपल्या उमेदवाराच्या विजयाची गणिती मांडत आहेत.
इंदोरी : एक जागा असूनही उत्साह
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या सर्वांत मोठ्या असलेल्या इंदोरी ग्रामपंचायतीने याही वेळी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखत एकूण १७पैकी १६ जागांवर बिनविरोध केल्या. सरपंचपदी कीर्ती पडवळ यांच्या बिनविरोध निवडीची व १६ उमेदवारांच्या बिनविरोध घोषणेची औपचारिकताच बाकी आहे.
वॉर्ड क्रमांक पाचमधील एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथे ८८६ पैकी ६९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वपक्षीय गावकीचा उमेदवार धर्मनाथ भापकर व अपक्ष उमेदवार बाळासाहेब पानसरे यांच्यात मुख्य लढत होत आहे. अपक्ष उमेदवार नितीन भापकर यांच्यामुळे निकालाची उत्सुकता वाढली आहे.
बनविरोध निवडणूक केल्याबद्दल माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिलीप ढोरे, भाजपाचे शहराध्यक्ष जगन्नाथ शेवकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकार घडला नाही.
शिरगाव, गोडुंब्रेत सुरळीत मतदान प्रक्रिया
शिरगाव : शिरगाव आणि गोडुंब्रे येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिरगावात २१, तर गोडुंब्रेत १२ जणांचे भवितव्य सोमवारी मतपेटीत बंद झाले. दोन्हीही गावांत मतदान शांततेत पार पडले. गोडुंब्रे येथे ८८५ पैकी ७९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिरगाव येथे १६४० पैकी १२९० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. शिरगावात एकूण ७८.६५ टक्के, तर गोडुंब्रेत ८९.४९ टक्के मतदान झाले. शिरगाव येथे सरपंचपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते.
सदस्य पदाच्या नऊ जागांसाठी सुमारे १६ उमेदवार रिंगणात होते. गोडुंब्रेत सरपंचपदासाठी चार उमेदवार,
तर सदस्यांच्या चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. मतदानप्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती तळेगाव स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी दिली.
वडगावात आज होणार मतमोजणी
निगडे ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक म्हणजेच ९१.२८ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी कुणे नामा ग्रामपंचायतीसाठी ७५.३६ टक्के मतदान झाले. त्याच प्रमाणे वरसोली ग्रामपंचायत साठी ८८.४५ टक्के, तर गोडुंब्रे साठी ८९.४९ टक्के, इंदोरी ग्रामपंचायत साठी ७८.२२, सावळा ग्रामपंचायतची ८१.६७ टक्के तर देवले ग्रामपंचायत साठी ८५.६८ टक्के ,भोयरे ग्रामपंचायती ९१.२३ टक्के तर शिरगाव ग्रामपंचायतसाठी ७८.६६ टक्के मतदान झाले. मंगळवारी (दि. १७) वडगाव येथील महसूल भवनात सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार असून प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली.