नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची होतेय दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:44 AM2018-02-24T01:44:33+5:302018-02-24T01:44:33+5:30
तालुका ते देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळविलेल्या तसेच ‘आयटी पार्क’ व रायसोनी इंडस्ट्रियल पार्कमुळे माण गाव आणि परिसरात झपाट्याने नागरिकरण झाले
वाकड : तालुका ते देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळविलेल्या तसेच ‘आयटी पार्क’ व रायसोनी इंडस्ट्रियल पार्कमुळे माण गाव आणि परिसरात झपाट्याने नागरिकरण झाले. ‘आयटी’च्या डोलाºयाला आणि नागरिकांच्या वाढत्या लोंढ्याला नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. सुनियोजित विकासासाठी येथे महापालिका अत्यंत गरजेची असल्याचे काही ग्रामस्थांचे मत आहे, तर काहींचा समावेशाला विरोध आहे.
आधुनिक आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून
गावच्या विकासावर भर देणारी ग्रामपंचात अशी ओळख असताना अनेक नवीन लोकहिताचे प्रकल्प राबविणारी ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.
विविध सुविधा ग्रामपंचायत सक्षमपणे पुरवित असताना मग महापालिका कशाला, असा काही ग्रामस्थांचा प्रश्न आहे.
जनगणनेनुसार ८२२२ इतकी गावाची लोकसंख्या आहे. सध्याची लोकसंख्या सुमारे ४० हजारांवर पोहोचली आहे.
गावाचे एकूण क्षेत्रफळ १९०५.४६ हेक्टर असून येथे सुमारे ७० आयटी कंपन्या असल्याने भू संपादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. गावाच्या वाड्या-वस्त्यांतही मोठ्या प्रमाणावर भाडेकरू वास्तव्यास आहेत.
माण गाव महापालिकेत समाविष्ट न झाल्यास विकासाला खो बसून बकालपणा वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्यास नियोजनबद्ध विकास होईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.
अनधिकृत बांधकामांकडे पीएमआरडीए डोळेझाक करीत आहे. ग्रामपंचायत आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो; मात्र तो पुरेसा नाही. परिणामी बोअरवेल आणि टँकरला मागणी आहे.