माहिती अधिकारातील माहिती वेळेवर न दिल्याने कामशेतमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:07 PM2018-01-23T18:07:39+5:302018-01-23T18:09:37+5:30
येथील ग्रुप ग्रामपंचायत खडकाळा प्रशासनाकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती वेळेवर न दिल्याने माहिती अधिकाराचे काम करणाऱ्याकडून राज्य माहिती आयोगाकडे केलेल्या तक्रारीमुळे तत्कालीन ग्रामसेवकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
कामशेत : येथील ग्रुप ग्रामपंचायत खडकाळा प्रशासनाकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती वेळेवर न दिल्याने माहिती अधिकाराचे काम करणाऱ्याकडून राज्य माहिती आयोगाकडे केलेल्या तक्रारीमुळे तत्कालीन ग्रामसेवकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
कामशेतमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज धावडे यांनी येथील ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता ती त्यांना तीस दिवसांत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी विस्तार अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ही सात दिवसांच्या आत ग्रामसेवक मतकर यांना माहिती देण्याचे आदेश देऊन ही धावडे याना माहिती मिळाली नाही. तदनंतर त्यांनी राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे रितसर अर्ज केला असता त्यावर सुनावणी होऊन आयुक्त जाधव यांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना ग्रामसेवक बाळासाहेब मतकर यांच्या विरोधात अपिलार्थीला माहिती न पुरवून कलम ७ (१) चे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर अधिनियमातील कलम २० (१) नुसार पाच हजार रुपयांचा दंडाचा आदेश देऊन तो त्यांच्या पगारातून कापून घ्यावा असे सांगितले. याशिवाय अर्जदारास त्याने मागितलेली माहिती त्याला एक आठवड्यात विनामूल्य पाठवावी.