मोठी कामगिरी केली पण नियतीने केला घात; पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
By नारायण बडगुजर | Published: August 14, 2023 05:57 PM2023-08-14T17:57:20+5:302023-08-14T18:00:37+5:30
मोठ्या कामगिरीमुळे कौतुक पण...
पिंपरी : अपघातात जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान (दि. १४) मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरीपोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे २ ऑगस्ट रोजी हा अपघात झाला होता. घरफोडीच्या गुन्ह्यात मोठी कामगिरी केली होती. त्यांची कामगिरी जगासमोर येण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
राजेश नामदेव कौशल्य (वय ३८), असे मृत्यू झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आहेत. राजेश कौशल्य हे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत होते. ते २००९ मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. सुरुवातीला नांदेड येथे त्यांनी काम केले. सन २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर ते पिंपरी-चिंचवड शहरात आले. दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून ते दरोडा विरोधी पथकात कार्यरत होते.
राजेश कौशल्य हे २ ऑगस्टला रात्री उशिरा दुचाकीवरून घरी जात होते. अचानक कुत्रा आडवा आला. त्याला वाचविताना दुचाकीला अपघात झाला. यात कौशल्य गंभीर जखमी झाले. रात्री रस्त्याने येणारे - जाणारे कुणीही नव्हते. त्यामुळे सुरुवातीला १५ ते २० मिनिटे त्यांना मदत मिळाली नाही. काही वेळाने तिथून जाणाऱ्या एका पीएमपी बस चालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. चालकाने एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राजेश कौशल्य यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रविवारी (दि. १३) त्यांना मेंदुमृत घोषित करण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. समाज सेवेची जाण असलेल्या राजेश यांनी त्यांचे अवयव दान करण्याचा अर्ज भरला होता. त्यांचे अवयव दान करण्यात आले.
मोठ्या कामगिरीमुळे कौतुक पण...
घरफोडीच्या गुन्ह्यात राजेश कौशल्य यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार दरोडा विरोधी पथकाने घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्या या कामगिरीबाबत वरिष्ठांकडूनही कौतुक झाले. या कामगिरीबाबत २ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत दरोडा विरोधी पथकाच्या कार्यालयात कायदेशीर कामकाज झाले. त्यानंतर रात्री उशिरा राजेश हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी अपघाताची घटना घडली.