१२७ शिक्षकांच्या भरतीला हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:26 AM2019-03-06T01:26:11+5:302019-03-06T01:26:17+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. प्राथमिक विभागामध्ये १२७ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार शाळांमधील बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्याआधारे रिक्त जागांची माहिती सरकारकडे पाठविण्यात आली आहे.
११ मार्चपासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ज्या उमेदवारांनी ‘अभियोग्यता’ आणि ‘बुद्धिमत्ता चाचणी’ परीक्षा दिली आहे. असेच उमेदवार भरतीसाठी पात्र असणार आहेत. तसेच पवित्र प्रणालीमध्ये ‘उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना’ या शीर्षकाखाली उमेदवारांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांच्या आरक्षणानुसार रिक्त पदे दिसणार आहेत. शिक्षक भरतीमध्ये अनेकवेळा गैरव्यवहार झाले असल्याचे आरोप करण्यात आले. तसेच खासगी अनुदानित
शाळांतील शिक्षक भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रिया होण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उपाययोजना करण्यास सांगितल्या होत्या. त्यानुसार, यंदा संपूर्ण माहिती बिंदूनामावलीनुसार प्रसिद्ध करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची संच मान्यता करण्यात आली. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. याप्रमाणे रिक्त पदे, विषय, प्रवर्ग यांची माहिती बिंदूनामावलीनुसार पवित्र संगणकीय प्रणालीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
>बिंदूनामावलीमध्ये बदल
भरती करताना यापूर्वी बिंदूनामावली तपासली जात असे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय यांसह विविध प्रवर्गांसाठी त्या-त्या प्रमाणात जागा राखीव ठेवून भरती केली जात असे. यापुढे होणाऱ्या भरतीमध्ये मराठा समाजासाठीही १६ टक्के जागा राखीव ठेवाण्यात आल्या आहेत. बिंदूनामावली तपासताना या १६ टक्क्यांचाही विचार होणार आहे. म्हणजे, यापूर्वी राखीव जागा सोडून सर्वसाधारण संवर्गांतील उमेदवारांसाठी ४८ टक्के जागा होत्या. आता मराठा समाजाच्या १६ टक्के जागा यातून कमी झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण संवर्गासाठी ३२ टक्के जागा शिल्लक आहेत.