पिंपरी शहरात क्रांतिकारकांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:50 AM2017-08-10T02:50:15+5:302017-08-10T02:50:36+5:30
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये क्रांती दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. शाळा, महाविद्यालयांमध्ये क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये क्रांती दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. शाळा, महाविद्यालयांमध्ये क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच विविध संस्था, संघटनांकडून कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी शहरातून रॅली काढण्यात आली. त्यात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाºया क्रांतिवीरांना क्रांती दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर बंधूंच्या पुतळ्यास व चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
चिंचवडगाव येथे झालेल्या कार्यक्रमास अपक्ष आघाडी गटनेते कैलास ऊर्फ बाबा बारणे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रवींद्र जाधव, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे आदी उपस्थित होते. चिंचवड स्टेशन येथे झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्य राजेंद्र गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
दापोडीतील कार्यक्रमास स्थायी समिती सभापती सीमा सावळे, नगरसदस्या स्वाती काटे, आशा धायगुडे-शेंडगे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित आचार्य श्री आंनदऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रांतिदिनानिमित्त चापेकर बंधूंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळा ते चापेकर चौक अशी प्रभातफेरी काढली होती. चापेकर बंधूंच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून क्रांतिज्योतीचे पूजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या जीवनावर पथनाट्य सादर केले. तसेच देशभक्ती गीतांचे गायन केले. कार्यक्रमास संस्थेचे आॅनररी सेक्रेटरी राजेद्र मुथा, सहायक सेक्रेटरी अनिल कांकरिया, प्राचार्या राय हरमिंदर आदी उपस्थित होते.
सी. के. गोयल महाविद्यालय
दापोडी : येथील सी. के. गोयल कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक व क्रीडा विभाग, इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिदिनानिमित्त परिसरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य विकास पवार, संपूर्ण स्टाफ व विद्यार्थी मिळून सकाळी ९.३० ते ११ या वेळेत परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. परिसरातील क्रांतिवीर भगतसिंग, तानाजी मालसुरे, नारायण दाभाडे यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय सेवा विभागप्रमुख बाळासाहेब मारोरे सूर्यकांत लिमये यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी प्राथमिक विद्यालय
मोशी : येथील यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक विद्यालयात क्रांतिदिनानिमित्त रॅली काढून क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी या महापुरुषांची वेशभूषा परिधान केली होती. आदर्शनगर, मोरया कॉलनी, तापकीरनगर या परिसरात रॅली काढण्यात आली. ओम पवार, मानसी मामसकर, तनिष्का माने, करण दरडे, गौरी तुपारे, श्रावणी जोगदंड या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांबदल माहिती सांगितली. या वेळी सुभाष देवकाते यांनी देशासाठी बलिदान केलेल्या क्रांतिकारकांच्या जीवन चरित्राची माहिती दिली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
गेंदीबाई चोपडा हायस्कू ल व कनिष्ठ महाविद्यालय
चिंचवड : येथील जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कू ल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ९.०० वाजता कॉलेज प्रांगणातून प्रभात फेरी काढण्यात आली. रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीते व घोषणाबाजीमुळे परिसरात उत्साह निर्माण झाला होता. संस्थेचे सचिव राजेंद्र मुथा, सहायक सेक्रेटरी अनिल कांकरिया, कोशाध्यक्ष प्रकाश चोपडा यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सकाळी ९.३० वाजता कॉलेजच्या सभागृहात कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष के. सी. अनेचा यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या सर्मपणाची व त्यागाची आठवण करून दिली. विद्यार्थी प्रतिनिधी पूजा घबडगे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीता कटारिया यांनी केले.
गुरू गणेश विद्यामंदिर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज
निगडी : जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित गुरू गणेश विद्यामंदिर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांती दिन उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने विद्यार्थी प्रशालेत विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषेत आले होते. कार्यक्रमास संस्थेचे सचिव राजेंद्र मुथा, सहायक सेक्रेटरी अनिल कांकरिया उपस्थित होते. या प्रसंगी विद्यालयाच्या आावारात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. क्रांती दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी क्रांती फेरी काढली होती. प्राचार्य नंदकुमार ठाकूर यांनी आपल्या भाषणातून आज समाजाला वेगळ्या प्रकारच्या क्रांतीची गरज आहे, ती म्हणजे स्वच्छता व स्त्री शिक्षण हक्क हे सांगितले. डी. बी. हांडे व बी. टी. नाळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. मा. ल. तोत्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
आकुर्डी : नवनगर शिक्षण मंडळ संचालित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गोविंद दाभाडे, तर प्रमुख अतिथी म्हणून दादासाहेब इथापे उपस्थित होते. या वेळी त्यांनी क्रांती दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. रमेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांचे अनुकरण करावे व राष्ट्राभिमान बाळगावा, असे सांगितले. विद्यार्थी भाषण दीप्ती मंगलनेर हिने केले. प्राचार्या साधना दातीर, उपप्राचार्या विजय बच्चे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, पर्यवेक्षिका सुरेखा हिरवे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.