पिंपरी-चिंचवडमध्ये उड्डाणपुलावरून सत्ताधाऱ्यांत गटबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:57 AM2017-08-11T02:57:58+5:302017-08-11T02:57:58+5:30
महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात निगडीपर्यंतच्या मेट्रोचा विचार केलेला नाही. तो करावा की न करावा, यावरून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत.
पिंपरी : महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात निगडीपर्यंतच्या मेट्रोचा विचार केलेला नाही. तो करावा की न करावा, यावरून भाजपाच्या पदाधिकाºयांमध्ये दोन गट पडले आहेत. प्रकल्पात कोणताही बदल केला जाणार नाही, अशी भूमिका महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेत्यांनी घेतली आहे, तर याबाबत प्रसंगी न्यायालयाचेही दरवाजे ठोठावू, असा इशारा भाजपाच्या दुसऱ्या गटाने दिला आहे.
महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर निगडी भक्ती-शक्ती चौक येथे शंभर कोटींचा उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचा विषय मंजूर करण्यात आला. दरम्यान, पिंपरी-चिंचवडपर्यंत असणारी मेट्रो निगडीपर्यंत न्यावी, अशी मागणी भाजपासह सर्व विरोधी पक्षांनी केली आहे. पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत न्यावी, अशी मागणी आताही जोर धरू लागली आहे. भक्ती-शक्ती चौकातील पुलाचे नियोजन मेट्रोपूर्वी झाले. राष्टÑवादी काँग्रेसच्या कालखंडात याबाबतचा आराखडा करण्यात आला होता. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोहोचला आहे. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो न्यायची झाल्यास राष्टÑवादीच्या कालखंडातील आराखड्यात सुधारणा गरज आहे.
सध्याचा प्रस्तावित पूल झाला आणि त्यानंतर मेट्रो न्यायची झाल्यास जनतेच्या पैशांचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे आराखड्यात बदल करावा, अशी मागणी भाजपाचे सरचिचणीस अमोल थोरात यांनी केली होती. मात्र, यावरून भाजपाचे पालिकेतील पदाधिकारी, प्रशासन व भाजपाचे मूळ कार्यकर्ते यांच्यात जुंपली आहे. कोणत्याही परिस्थितीत आराखडा बदलणार नाही, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे एकाच प्रकल्पावरून भाजपात मतभेद असल्याने या प्रकल्पाला खोडा बसतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात ग्रेड सेपरेटरला खोडा हे वृत्त प्रकाशित केले होते.
निगडीपर्यंत मेट्रोचे पहिल्या टप्प्यात नियोजन नाही. पहिला टप्पा पिंपरीपर्यंत आहे. ती निगडीपर्यंत न्यावी, याबाबत आम्ही आग्रही आहोत. मेट्रो जेव्हा होईल, त्या वेळी भक्ती-शक्ती चौकातून ती कशी न्यायची हा भविष्यातील नियोजनाचा भाग आहे. तूर्तास या प्रकल्पाच्या उद्घाटनास काहीही अडचण नाही. - एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते
महापालिकेतील भाजपाच्या पदाधिकाºयांनी निगडीतील उड्डाणपुलाचा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. प्रकल्पाला विरोध नाही. इतरांनी आजवर चुका केल्या. त्याचा शहरास फटका बसला. नियोजनात बदल करा, अशी भूमिका आहे. - अमोल थोरात, सरचिटणीस, भाजपा