ऐन सणासुदीत डाळी कडाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:03 AM2017-08-19T02:03:40+5:302017-08-19T02:03:43+5:30
गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला असताना डाळी आणि कडधान्यांच्या किमती कडाडल्या आहेत.
पिंपरी : गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला असताना डाळी आणि कडधान्यांच्या किमती कडाडल्या आहेत. चणा, वाटाणा, मूग, हरबरा डाळ व मसूरच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
श्रावण महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. त्यामुळे डाळींना मागणी वाढली आहे. त्यातच आयातीवर घालण्यात आलेली तात्पुरती बंदी यांमुळे घाऊक बाजारात कडधान्य व डाळींच्या भावात सुमारे पाच ते अठरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातच बाजारात मालाचा तुटवडा निर्माण होताच काही व्यापाºयांकडून डाळींची साठेबाजी करून नफेखोरी करण्याचे प्रकारही सर्रास सुरू आहेत. याचाही प्रतिकूल परिणाम डाळींच्या किमतीवर पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून सणासुदीमुळे कडधान्य व डाळीला मोठी मागणी वाढली आहे. तसेच आयातीत डाळींवर बंदी घालण्यात आली. परिणामी आठवडाभरातच डाळी व कडधान्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात ५३०० ते ५५०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकली जाणारी तूरडाळ आज ६६०० ते ७१०० रुपये क्विंटल इतकी झाली आहे. मूगडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ, चणाडाळ यांच्या भावातही क्विंटलमागे पाचशे ते सातशे रुपयांनी वाढ झाली आहे. डाळींप्रमाणेच कडधान्यांच्या भावातही वाढ झाली आहे. ५५०० ते ५७०० रुपये क्विंटल भावाने मिळणाºया मुगाचा दर सध्या ६६०० ते ६७०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. त्याचप्रमाणे चणा, वाटाणा, मसूर, घेवडा, हुलगा, चवळी आदींच्या भावातही क्विंटलमागे दोनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.
>व्यापाºयांकडून साठेबाजी
वास्तविक बाजारात मुबलक प्रमाणात माल असताना भाववाढ करण्याचे काहीही कारण नाही. मात्र, व्यापारी हवामान, आवक आणि मागणी याचा अंदाज घेऊन मोठ्या प्रमाणात साठेबाजी करतात. त्यामुळे मागणी वाढताच चढ्या भावाने मालाची विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो. व्यापाºयांच्या अशा कुटनीतीमुळे सामान्य नागरिकांना मात्र सणवार साजरे करताना काही प्रमाणात का होईना, हात आखडता घ्यावा लागत आहे. अन्न आणि औैषध प्रशासनाने अशाप्रकारे नफेखोरी करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.