Gudi Padwa 2018 : गुढीपाडव्यामुळे बाजारपेठेत गर्दी, मुहूर्तावर खरेदीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 03:19 AM2018-03-18T03:19:38+5:302018-03-18T06:20:20+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे गुढीपाडवा. या उत्सवाचा आनंद द्वीगुणित करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी नवीन घर, सदनिका व वाहनांचे बुकिंग केले. त्यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्यात येणार आहे.
पिंपरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे गुढीपाडवा. या उत्सवाचा आनंद द्वीगुणित करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी नवीन घर, सदनिका व वाहनांचे बुकिंग केले. त्यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्यात येणार आहे.
पिंपरी-बाजारपेठेत सण, उत्सावाच्या काळात मोठी उलाढाल होत असते. मराठी नववर्षारंभ असल्याने या मुहूर्तावर व्यवसाय उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्यास अनेक जण प्राधान्य देतात. यामुळे व्यवसाय व उद्योगाची भरभराट होण्याची धारणा आहे. या श्रद्धेपोटी नवीन शुभारंभ, वास्तू, वाहन, दागिने खरेदी यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी येथील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत.
गुढीपाडवा या सणाला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणाच्या तोंडावर अनेकांनी हक्काच्या घराचे स्वप्न साकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शहराच्या मोशी, चिखली, जाधववाडी, चºहोली, डुडुळगाव, पुनावळे, रावेत, ताथवडे, तळवडे या भागात तसेच देहू, तळेगाव, वडगाव, कामशेत अशा मावळच्या भागातही लोक घर घेण्यास पसंदी देत आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक दिवस रिअल इस्टेट मार्केट ठप्प झाले होते. मात्र, पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी घरांचे बुकिंग केले आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आकर्षक योजना दिल्या आहेत. नवनगर प्राधिकरणाकडे ही पाडव्याच्या मुहूर्तावर प्लॉट खरेदीला नागरिकांनी पसंती दिली आहे.
ज्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र, घरी चारचाकी नाही अशा लोकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर घरी चारचाकी येईल अशी तयारी केली आहे. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच मोटारीची बुकिंग करून ठेवली आहे. कागदपत्रांची पूर्तता करून कर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवली आहे.
सोने-चांदी बाजारात तेजी
सराफ बाजारातही सोने-चांदी खरेदीसाठी लोकांची लगबग दिसत आहे. काही नागरिकांनी दागिने खरेदीला प्राधान्य दिले आहे. सुटीच्या दिवशी गुढीपाडवा आल्याने सर्वच बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे. काहींनी मुहूर्तावर सोने-चांदीच्या दुकानांची सुरुवात केली आहे. तर ग्राहकांनी पाडव्यातील सराफांच्या सवलतीच्या योजनांचा लाभ घेत आर्थिक गुंतवणुकीची तयारी दाखविली आहे.