फटाका विक्रेत्यांकडून नियम पायदळी, शहरवासीयांची सुरक्षा धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 01:30 AM2018-11-07T01:30:45+5:302018-11-07T01:31:02+5:30
दिवाळीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल विनापरवानगी व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे.
रावेत - दिवाळीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल विनापरवानगी व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. शहरात २०१७ मध्ये ११० व्यावसायिकांनी फटाका विक्रीसाठी परवानगी घेतली होती. यंदा त्या तुलनेत खूप कमी व्यावसायिकांनी ही परवानगी घेतली आहे. असे असले, तरी शहरभर हजारो व्यावसायिक फटाक्यांची विक्री करीत आहेत. त्यामुळे नियम पायदळी तुडविले जात असून, शहरवासीयांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
फटाका विक्री स्टॉलसाठी अग्निशामक दल व पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या जीविताच्या दृष्टिकोनातून नियमावली तयार केली आहे. मात्र अनेक स्टॉलधारक या नियमांना पायदळी तुडवत स्टॉल उभारतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. शहरासह उपनगरात पदपथावर, तसेच वर्दळीच्या ठिकाणी फटाका स्टॉल उभारण्यात आले आहेत, तर अनेकांनी किराणा दुकानात फटाकांची राजरोसपणे विक्री सुरू केली आहे. सर्वत्र दीपावलीची लगबग सुरू असताना रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, बिजलीनगर, आकुर्डी रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी फटाका विक्रीची बेकायदा दुकाने थाटली आहेत. फटाके विक्रीसाठी अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि संबंधित पोलीस ठाण्याची परवानगी बंधनकारक असताना विक्रेत्यांनी तशी परवानगी घेतली नसल्याचे दिसून येते. अशा अनधिकृत दुकाने व बेकायदा विक्रीवर कारवाई करण्याकडे महापालिका प्रशासन व पोलीस डोळेझाक करीत आहेत. पालिकेचे अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाने परवाना दिल्यानंतर त्या व्यक्तीने अग्निशामक दलातर्फे दिलेल्या परवान्याची प्रत संबंधित पोलीस ठाण्यात देणे अपेक्षित आहे. मात्र, उपनगरात जवळपास ८० ते ९० टक्के विक्रेत्यांनी पोलिसांची परवानगी न घेता दुकाने थाटली आहेत. या भागातील मुख्य रस्त्यांवर, तसेच या भागात गल्लीबोळात फटाके विक्रीची शेकडो दुकाने दिसून येत आहेत. कायद्याचा धाक न बाळगता ही दुकाने उभारली जात आहेत. एखादी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दाट वसाहतींमध्येही थाटली दुकाने
फटाके विक्रीचा कहर म्हणजे परिसरात काही ठिकाणी किराणा दुकानातदेखील फटाके विक्रीला ठेवल्याचे दिसून आले. अशा प्रकारच्या नागरी वसाहतीतील दुकानांमधून फटाक्याची विक्री राजरोस सुरू आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांना जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुरक्षतेच्या नियमावलीनुसार प्रत्येक फटका विक्री दुकानात धूम्रपान निषेधाचा फलक बंधनकारक असताना, एकाही ठिकाणी असा फलक दिसून येत नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फटाके विक्रीच्या ठिकाणी किमान बादल्यांमध्ये वाळूचा साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, एकाही ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा दिसून आली नाही. अशा विक्रेत्यांवर कारवाई संदर्भात महापालिकेचा अतिक्रमण विभाग व पोलीस कधी कारवाई करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
सुरक्षेबाबत सर्वच यंत्रणा गाफील
फटाका विक्रीच्या प्रत्येक दुकानामध्ये दहा फुटांचे अंतर आवश्यक असताना या नियमाचे पालन करण्यात आलेले नाही. आरसीसी बांधकामाच्या ठिकाणीच फटाका विक्रीचे दुकान असावे, तसेच नऊ मीटरचा रस्ता असेल त्या ठिकाणीच दुकान लावावे असा नियम असतानाही अरुंद रस्त्यांवर दुकाने थाटली आहेत. धूम्रपान निषेधाचा फलक बंधनकारक असताना एकाही ठिकाणी असा फलक दिसून आला नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी किमान २०० लिटर बॅरलमध्ये पाण्याचा साठा, बादल्यांमध्ये वाळूचा साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र एकाही ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा उपलब्ध असल्याचे दिसून आले नाही. सुरक्षेबाबत फटाके विक्रेत्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. महापालिका आणि संबंधित विभागही याबाबत गाफील असल्याचे दिसून येते.
वर्दळीच्या ठिकाणी उभारले स्टॉल
विशेष म्हणजे वर्दळीच्या आणि नागरी वसाहत असलेल्या ठिकाणी देखील दुकाने थाटली आहेत. काही व्यावसायिकांनी इतर वस्तूंच्या दुकानाबाहेर तात्पुरता मंडप उभारून फटाका स्टॉल उभारले आहेत. असे असतानादेखील पोलीस वा अग्निशामक विभागातर्फे कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. जर बेकायदा फटाके विक्रीच्या दुकानांमुळे दुर्घटना उद्भवली, तर अग्निशामकच्या वाहनालादेखील अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
तात्पुरता फटाका स्टॉल नियमावली
फटाका स्टॉलसाठी पोलीस, महापालिका, अग्निशामक दलाची परवानगी आवश्यक
धूम्रपान निषेध फलक ठळक इंग्रजी-मराठी भाषेत लावावा
फटाक्यांची मांडणी दुकानाचे शटर बाहेर करू नये, रस्त्यावर अतिक्रमण करू नये
स्टॉलवर वाळू, पाण्याच्या बादल्या व अग्निशामक साधने असावीत,
फटाके विक्रीच्या ठिकाणी २०० लिटर पाणीसाठा असावा
फटाका स्टॉलचे नाव ठळकपणे दिसेल असा बोर्ड असावा
फटाका जास्तीत जास्त साठा व मर्यादा ५० किलो
शोभेच्या दारूव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूची विक्री करू नये
जलद, ज्वालाग्राही फटाके स्वतंत्र पॅकिंगमध्ये ठेवावीत
स्फोटक, ज्वलनशील, पेट्रोलजन्य पदार्थ स्टॉलजवळ ठेवू नयेत
लहान मुले, अपंग, अपरिचित व्यक्तीला स्टॉलवर बसवू नये
परिसरातील नागरिक व इतरांनी अग्निशामक दलाकडे तक्रार केल्यास ना हरकत रद्द होते
अग्निशामक दलातर्फे मिळणारा ना हरकत दाखला म्हणजे फटाके विक्रीचा परवाना होत नाही. त्या व्यक्तीने संबंधित पोलीस ठाण्याचीही परवानगी घेणे बंधनकारक आहे. ज्यांनी अग्निशामक व पोलिसांची परवानगी घेतली आहे, त्यांनाच फटाके विक्रीचा अधिकार आहे. बेकायदापणे फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार पोलिसांना असून, अशा विक्रेत्यांवर कारवाई संदर्भात महापालिका अतिक्रमण विभाग व पोलीस यांना कळविण्यात आले आहे.
- किरण गावडे, मुख्य अधिकारी, अग्निशामक विभाग, महापालिका