पर्यटकांना गाईडच करताहेत मिसगाईड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:31 AM2018-10-04T01:31:17+5:302018-10-04T01:31:22+5:30
जांभवली भीमाशंकर ट्रेक : अर्धा वाट्यावर सोडून देण्याचे प्रकार; राजरोसपणे उकळले जातात पैसे
कामशेत : जांभवली येथील डोंगरातून भीमाशंकरकडे जाणारा जुना रस्ता (पायवाट) असून, हा रस्ता पूर्ण जंगलमय आहे. अनेक ट्रेकर कर्जत ते जांभवली-भीमाशंकर असा ट्रेकचा आनंद घेतात. यासाठी माहितगार गाईड घेऊन जातात. मात्र काही गाईड पर्यटकांकडून पैसे घेऊन त्यांना अर्ध्या वाटेवर सोडून देण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी पर्यटकांसह स्थानिक नागरिकही करू लागले आहेत.
जांभवली गावाच्या हद्दीत प्राचीन कोंडेश्वर देवस्थान आहे. पूर्वी दगडातील देवस्थानाचा काही वर्षांमध्ये मोठा विकास झाला आहे. त्यापुढे ढाक भैरी व ढाक किल्ला ही ठिकाणे आहेत. तसेच येथून भीमाशंकरकडे आठ ते दहा तासांत चालत जाता येते. अनेक ट्रेकर व पर्यटक हा ट्रेक करतात. अनेक कारणांमुळे या भागात पर्यटकांची व ट्रेकर यांची सुटीच्या दिवशी गर्दी असते. मात्र वाहन पार्किं ग, देवस्थान देणगी आदींच्या नावाखाली स्थानिक पर्यटकांना वेठीस धरतात. विविध कारणांसाठी पर्यटकांकडून पैसे उकळतात. पर्यटकांनी पैसे दिले नाही, तर दमबाजी केली जाते, असे अनेक बाहेरील पर्यटक सांगतात. परिसरात लागलेल्या वाहनांमधील इंधन चोरी व इतर सर्रास होते. शिवाय मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटक व भाविकांना स्थानिक पिंडीवर दक्षिणा टाकण्याची जबरदस्ती करतात. जंगल भाग असल्याने पर्यटक नाखुशीने मागणी केलेले पैसे देतात. अनेकदा यामुळे वादावादीचे प्रसंग घडतात़ मात्र पर्यटक नमतेपणा घेतात. पर्यटक पोलिसात तक्रार करीत नसल्याने काही स्थानिक लोकांचे फावले असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या भागात पार्किं गची सुविधा करावी, त्यानुसार दरपत्रक लावावे, मंदिरात अभिषेक व इतर धार्मिक विधीसाठी दरपत्रक लावावे, ट्रस्ट कमिटी, गाईड, पोलीस ठाणे आदींची माहिती पत्रके लावावी. पर्यटकांसाठी तक्रार पेटी ठेवावी आदींची मागणी होत आहे.ाासाठी आलेले पुण्यातील पर्यटक यांच्या चारचाकी वाहनातील त्यांच्या सुमारे साडेसहा हजार रुपये लंपास झाले. त्यांना जेवण करण्यासाठीही पैसे शिल्लक राहिले नाही. तर मागील वर्षी मुंबई येथील एक जोडपे जांभवली ते भीमाशंकर हा ट्रेक करण्यासाठी आले होते. त्यांनी गावातील एक गाईडला त्याने मागणी केल्यानुसार पैसे दिले. मात्र त्यांना रात्री आठच्या सुमारास अर्ध्या वाटेत जंगलात सोडून आता सरळ रस्ता पुढे आहे असे सांगून निघून गेला. या जंगलातून त्यांनी बिकट वाटेतून वाट काढत सुटका केली.
श्री क्षेत्र कोंडेश्वर हे अति प्राचीन देवस्थान आहे. नाणे मावळात पर्यटकांची संख्या केवळ यामुळे वाढत आहे. आणि अशा ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर पर्यटकांची संख्या कमी होईल. त्यामुळे स्थानिक लोकांचेच नुकसान होणार आहे. येथील देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि संबंधित प्रशासन आदींची बैठक घेऊन योग्य त्या सूचना द्याव्यात. संबंधितांवर कडक कारवाई करावी. पर्यटकांना त्रास होणार नाही या संबंधीची व सुरक्षेची यंत्रणा राबवून पर्यटकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. - दत्तात्रेय शेवाळे, सदस्य, पंचायत समिती
नाणे मावळातील जांभवली भागात पार्किंगसाठी पर्यटकांना काही जण त्रास करीत असल्याचे काही गावकऱ्यांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसांत गावात ग्रामस्थांची बैठक घेणार आहे. शिवाय पर्यटकांच्या काही तक्रारी आल्यास संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार आहे.
- नीलकंठ जगताप,
पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी