गुंड काळभोरसह साथीदारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:03 AM2017-11-28T04:03:58+5:302017-11-28T04:05:48+5:30
रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खुनातील मुख्य आरोपी सोन्या काळभोरसह अन्य चार फरारी आरोपींनाही निगडी पोलिसांनी रविवारी रात्री मळवली येथून अटक केली.
पिंपरी : रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खुनातील मुख्य आरोपी सोन्या काळभोरसह अन्य चार फरारी आरोपींनाही निगडी पोलिसांनी रविवारी रात्री मळवली येथून अटक केली. सोमवारी मोरवाडी न्यायालयात हजर केले असता, २ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित चार आरोपींना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.
रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोन्या काळभोर, अक्षय काळभोर (दोघे रा. पंचतारानगर, आकुर्डी), दत्ता काळभोर (रा. समर्थनगरी, निगडी), जीवन सातपुते, बाबा ऊर्फ अमित फ्रान्सिस (दोघे रा. भोसरी) यांना रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी महाकाली टोळीचा प्रमुख व अनिकेत खूनप्रकरणी सहभाग असलेला हनम्या शिंदे, तेजस प्रदीप मांडलिक (वय २१ रा. दत्तवाडी, आकुर्डी), अक्षय सुरेश नेहरे (वय २१, रा. आकुर्डी), वासुदेव ऊर्फ संतोष हिरामण जोशी (वय २५, रा. आकुर्डी) यांना यापूर्वीच अटक केली आहे. अनिकेत खून प्रकरणातील एकूण ९ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी शंकर आवताडे यांनी दिली.
रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा २० नोव्हेंबरला रात्री आकुर्डी येथील शितळादेवी मंदिराजवळ खून करण्यात आला. तलवारीने वार करून, तसेच डोक्यात दगड घालून अनिकेतचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी अनिकेतने तयार केलेल्या रावण टोळीतील दोन जणांनी रविवारी रात्री सोन्या काळभोर याच्यावर गोळीबार केला. त्यात सोन्या काळभोरने गोळी चुकवली, मात्र त्याचे दोन साथीदार जखमी झाले, अशी चर्चा शहरात होती. मात्र, फरार गुंड सोन्या काळभोर हा मावळ परिसरात असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यांनी तपास पथकाच्या मदतीने सोन्यासह त्याच्या चार साथीदारांना पकडले.