वडगाव मावळ हद्दीत बनावट पास लावत गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 06:08 PM2020-05-09T18:08:45+5:302020-05-09T18:11:01+5:30
ट्रकच्या काचेवर बनावट अत्यावश्यक सेवेचा पास लावत त्यातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.
वडगाव मावळ : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा लाईफ सेव्हर मेडीकल असा बनावट पास लावत गुटख्याची वाहतूक करणारा एक ट्रक वडगाव मावळ हद्दीत जप्त केला.पुणे ग्रामीण दलातील गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री सापळा रचून ही कारवाई केली. त्यामधून ३६ लाख रुपये किमतीचा गुटखा व १५ लाखांचा ट्रक असा एकूण ५१ लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी कंटेनर नारायणसिंग धनसिंग चौहान (वय ३९ रा. बांगडी ता.रायपूर पाली राजस्थान) व महेंद्रंसिंग लक्ष्मणसिंग चौहान (वय २८ रा.राजस्थान)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे अन्वेषन शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन असल्याने पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक एक पथक तयार करण्यात आले आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारलेला आहे. त्यात जीवनावश्यक माल व वस्तूंची वाहतूक विक्री वगळून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, एका ट्रकच्या पुढच्या काचेवर बनावट अत्यावश्यक सेवेचा पास लावत त्यातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. तोच ट्रक वडगाव फाट्यावर आल्यावर त्याच्या चालकाकडे चौकशी केली असता त्याने ट्रकमध्ये तांदळाची पोती असल्याचे सांगितले. मात्र, तपासणी केली असता ३६ लाख रुपये किमतीची राजनिवास नावाची गुटख्याची एकूण ३० हजार पाकिटे मिळाली. त्यानंतर ही गुटख्याची पाकिटे व १५ लाखांचा ट्रक असा एकूण ५१ लाखांचा ऐवज जप्त केला.
पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, पोलिस कर्मचारी दतात्रय जगताप, प्रकाश वाघमारे,राजू पुणेकर,अक्षय नवले यांनी ही कारवाई केली.घटनास्थळी अन्न व औषध प्रशासनाने पाहणी करून पंचनामा केला.वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.