गुटखा, पानमसाल्याची होतेय मावळ तालुक्यात राजरोस विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:54 AM2019-01-11T02:54:22+5:302019-01-11T02:54:51+5:30
किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई : ‘गुटखा किंग’ मोकाटच
पिंपरी : गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थ विक्री साठवणूक यावर राज्य सरकारने बंदी घातली असताना मावळातील सर्वच ठिकाणी हे पदार्थ खुलेआम विकले जात आहे. तालुक्याच्या मुख्य ठिकाणावरून हा माल प्रमुख व महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांना पुरवून इतर व्यापारी, किराणा दुकानदार, किरकोळ विक्रेते व पान टपरीधारकांपर्यंत पोहचत आहे. या गुटखा विक्रीच्या व्यवसायात दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, व्यापारी मोकाट आहेत.
मावळ तालुक्यात देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा सह काही महत्त्वाच्या बाजारपेठ आहे. किरकोळ विक्रेते येथील व्यापाºयांकडून गुटखा, पानमसाला खरेदी करतात. येथील व्यापाºयांवर कारवाई न करता केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होत आहे. परिणामी ‘गुटखा किंग’ असलेले व्यापारी मोकाटच आहेत.
अन्न व औषध प्रशासन पथकाकडून मंगळवारी (दि. ८) कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करताना या वेळी दोन व्यापारी आढळले. त्यांच्यावर कारवाई करीत अंदाजे ८६,९१० रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त करून त्यांच्यावर कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या वेळी अन्न व औषध प्रशासन विभाग सहाय्यक आयुक्त संपत देशमुख यांच्या मार्गदर्शनाने व सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी आर. आर. काकडे, संतोष सावंत, अनिल गवते, स्वाती म्हस्के यांच्या पथकाने मंगळवारी सकाळपासून विविध दुकानांवर छापा टाकून ही कारवाई केली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गदिया कॉम्प्लेक्समधील राजभवन किराणा दुकानात प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा व पानमसाला विक्री करताना आढळून आला. या कारवाईत सुमारे ७६,२३० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. त्याच प्रमाणे शिवम ट्रेडर्स या दुकानात छापा टाकून १०,६८० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अमराराम वनाजी चौधरी व भरत चंपालाल जैन या दोन व्यापाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती काकडे यांनी दिली.