‘एचए’ जागाविक्रीबाबत हालचालींना वेग
By admin | Published: April 24, 2017 04:45 AM2017-04-24T04:45:42+5:302017-04-24T04:45:42+5:30
पिंपरीतील हिंदुस्थान अॅँटिबायोटिक्स (एचए) कंपनीची सव्वा एकर जमीन घेण्यासंदर्भात एचएने म्हाडाला पत्र दिले आहे. जमीन
पिंपरी : पिंपरीतील हिंदुस्थान अॅँटिबायोटिक्स (एचए) कंपनीची सव्वा एकर जमीन घेण्यासंदर्भात एचएने म्हाडाला पत्र दिले आहे. जमीन घेण्याबाबतच्या पत्राबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. म्हाडाला ही जागा उपलब्ध झाल्यास शहरातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत.
पिंपरीतील नेहरुनगर परिसरात एचची सत्तर एकर जागा आहे. दरम्यान, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कंपनीला उभारी देण्यासाठी सध्याच्या जमीनीपैकी काही जमीन विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ‘म्हाडा’ ने सर्वाधिक रक्कम देण्याची तयारी दर्शविली. हा विषय केंद्रीय मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला होता. ही जमीन म्हाडाने ११० कोटींना घ्यावी, असे पत्र एचएकडून म्हाडाला देण्यात आले होते. त्यांच्याकडून आलेले हे पत्र म्हाडाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविले असून त्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कंपनीच्या या सव्वाएकर जागेवर म्हाडाकडून परवडणारी घरे बांधण्याचे नियोजन केले जाणार आहे. दरम्यान, जमीन-विक्रीतून एचए कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)