धक्कादायक! मोबाइल गेमचा नाद; मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

By नारायण बडगुजर | Published: July 29, 2024 06:12 PM2024-07-29T18:12:55+5:302024-07-29T18:13:41+5:30

नववीमध्ये शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला मुलगा अभ्यासात अत्यंत हुशार होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो एका मोबाइल गेमच्या नादाला लागला

habbit a mobile game the boy ended his life by jumping from the 14th floor in pimpri chinchwad | धक्कादायक! मोबाइल गेमचा नाद; मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

धक्कादायक! मोबाइल गेमचा नाद; मुलाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

पिंपरी : मोबाईल गेमिंगच्या नादातून एका १५ वर्षीय मुलाने जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून त्याने उडी मारून आत्महत्या केली. पिंपरी चिंचवड शहरातील किवळे येथे ही धक्कादायक घटना घडली. 

किवळे येथील उच्चभ्रू हाउसिंग सोसायटीतील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर राहण्यास असलेल्या एका कुटुंबातील १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. मुलाचे वडील नोकरीनिमित्त परदेशात असतात. तर आई गृहिणी आहे. इयत्ता नववीमध्ये शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला मुलगा अभ्यासात अत्यंत हुशार होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तो एका मोबाइल गेमच्या नादाला लागला. लॅपटाॅपवर तो गेम खेळत होता. त्यातून तो एकटाच राहत असल्याने वडील मायदेशी परतले. त्यावेळी तो पुन्हा सर्वांमध्ये मिसळून पूर्वीप्रमाणे वावरत होता. दरम्यान, वडील नोकरीनिमित्त पुन्हा परदेशात गेल्यानंतर तो पुन्हा गेमच्या आहारी गेला. त्यातून तो त्याच्या खोलीत स्वत:ला कोंडून घेत होता. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. 

अतिवृष्टीमुळं २५ जुलैला शाळांना सुट्टी होती, तो दिवस त्याने गेम खेळण्यात घालवला. रात्री विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र, जेवण केल्यानंतर पुन्हा तो खोलीत गेला. लहान मुलाला ताप आल्याने त्याची आई चिंतेत होती. रात्रीचा एक वाजला तरी देखील मुलाचा ताप उतरेना, त्यामुळे आई जागीच होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सॲप ग्रुपवर एक मेसेज आला. एक मुलगा जखमी अवस्थेत खाली पडल्याचा उल्लेख मेसेजमध्ये होता. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला. ती खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा खोलीत नव्हता. त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली. जखमी अवस्थेत पडलेला मुलगा तिचाच होता. 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या मुलाला पाहून, आईची पायाखालची जमीन सरकली. मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले. पण त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. घरात एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेलं काहीतरी आढळलं. मात्र यातून त्याला काय नमूद करायचं होतं, याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेबाबत माहिती मिळताच मुलाचे वडील परदेशातून परतले.  

किवळे येथे ही घटना घडली. मुलगा एकलकोंडी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे. - महेंद्र कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रावेत

Web Title: habbit a mobile game the boy ended his life by jumping from the 14th floor in pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.