वर्गणीदारांनी घेतला आखडता हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:19 AM2017-08-02T03:19:32+5:302017-08-02T03:19:32+5:30
गणेशोत्सव मंडळांना विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, उद्योजक, व्यावसायिक मोठ्या रकमेची वर्गणी द्यायचे.
पिंपरी : गणेशोत्सव मंडळांना विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, उद्योजक, व्यावसायिक मोठ्या रकमेची वर्गणी द्यायचे. नोटाबंदीचा निर्णय, त्यानंतर जीएसटी लागू झाल्याने यंदा वर्गणीदारांनी गणेशोत्सव मंडळाची पावती फाडण्यासाठी आखडता हात घेतला आहे. अवघ्या १५ दिवसांवर दहीहंडी उत्सव आला आहे. त्यानंतर गणेशोत्सव असल्याने कार्यकर्त्यांची तयारी सुरू झाली असून कार्यकर्त्यांना वर्गणी जमा करताना अडचणी येऊ लागल्या आहेत.
निवडणुकीची समीकरणे जुळवून अनेक राजकीय पुढारी स्वत:हून दहीहंडी व गणेशोत्सव मंडळाच्या संपर्कात राहात होते. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते कामी येतील, या आशेने ते परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांना बोलावून मोठ्या रकमेची पावती फाडत असत. या वेळी मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही़ दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्या भेटी घेत आहेत. मात्र, सद्या परिस्थिती बिकट आहे़ मागील वर्षी जेवढी वर्गणी दिली, तेवढी या वेळी देणे शक्य नाही. असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्यावसायिकांनी फिरवली पाठ
आजूबाजूचे दुकानदार, व्यावसायिक हे त्या त्या परिसरातील गणेशोत्सव मंडळांना, दहीहंडी उत्सव मंडळांना दरवर्षी वर्गणी देतात. गतवर्षीची वर्गणी फाडल्याची पावती दाखवून तेवढ्या रकमेची पावती फाडण्यास ते तयार होतात. अधिकची रक्कम मागितल्यास मात्र त्यांची कुरबुर सुरू होत असल्याचे चित्र आहे.